Thursday, 7 June 2018

पांघरुणघामाघूम झालेल्या मजुरानं मधुराला सांगितलंच शेवटी,"बहेनजी, ये हमसे नही उठाया जाता...किसी दुसरे को बुला लेना...चाहिए तो हमे पैसा कम देना"
गेला अर्धा पाऊण तास त्यांचे चाललेले निकराचे प्रयत्न ती पाहत होतीच. एवढा मोठा वजनी पलंग वर चढवणं खरंच त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं. पहिल्या घरातून बाहेर काढून ट्रकमध्ये ठेवतानाच चौघे घामाघूम झाले होते.
"अच्छा ठिक है...कोई बात नही...रहने दो..हम देखते है",असं म्हणून मधुराने ठरलेले पैसे त्यांच्या हातावर ठेवले. ती शेखरकडे वळली,"शेखर, बाकीचं सामान गेलं घरात पण या पलंगाचं काय? इथेच ठेवून कसं चालेल? बघ ना कोणी मिळतं का चढवायला..."
"अगं या धट्ट्याकट्ट्या चौघांना त्याने घाम फोडला. मला नाही वाटत कोणाला जमेल. आपण तो आता विकून टाकू. तसाही इथे नवीन बेड केलाच आहे."
तो पलंग विकण्याचा पर्याय शेखरने याआधीही सुचवला होता, पण आडून.
त्याला या विषयातलं मधुराचं हळवेपण माहित होतं. म्हणूनच तर त्याची वरात नव्या घरापर्यंत काढली गेली. सामान शिफ्ट करायला आलेल्या माणसांनी जेव्हा हात टेकले तेव्हा कुठे तो विकून टाकण्याबद्दल शेखर स्पष्टपणे बोलला.
"असं म्हणतोस?.." तिच्या स्वरांतली उदासी काही लपली नाही. "त्याची अडचण होईल हे मान्य. पण प्रयत्न करून बघूया ना, कुठे अॅडजस्ट करता येतो का ते."
तो पलंग ही संसारासाठी दोघांनी मिळून केलेली पहिलीच खरेदी. केवळ विसाव्याची जागा नाही तर त्यांच्या उत्कट प्रणयाचा साक्षीदार होता तो. हळुवारपणे उमलत, बहरत गेलेल्या त्यांच्यामधल्या नात्याचा मूक साक्षीदार. जाईजुईमोग-याच्या गंधाने भारलेल्या अनेक रात्रींच्या मधुर आठवणी त्याच्याशी निगडीत होत्या.

लग्नानंतर वर्षभरातच आलेलं पहिलं बाळंतपण. या बाळंतपणात तिचा आणि बाळाचा- सर्वेशचा चोवीस तास मुक्काम या पलंगावरच असे. तान्हुल्याला डासचिलटांचा त्रास होऊ नये म्हणून शेखरने मच्छरदाणीसाठी पलंगाच्या चारही बाजूंनी सळया उभारल्या...बाळासाठी घरातली सर्वात सुरक्षित जागा होती ती..त्याचं जगच पलंगाच्या अवतीभवती सामावलं होतं तेव्हा. बाळाच्या सामानाची इतकी गर्दी व्हायची की तो भलामोठा पलंगही अपुरा वाटे अनेकदा. पुढे मुलीच्या वेळीही तेच...पुन्हा काही काळासाठी पलंगाचं तंबूत झालेलं रूपांतर. त्याला वेढून राहणारा बाळंतओव्याचा- धूपाचा वास. दोन्ही मुलांचाही या पलंगावर विशेष जीव. त्यांची ती घरातली सर्वात आवडती जागा. "मनसोक्त लोळणं असो, की अभ्यास किंवा मस्तीचा मूड...सगळं काही पलंगावर. मित्रांना गोळा करून किती धुडगूस घातलाय सर्वेशनी. दणकट होता म्हणूनच टिकला त्यांच्या दंगामस्तीत." पलंगावरून मायेनं हात फिरवत मधुरा जुने दिवस आठवत राहिली.
"आठवतंय की...मनालीचं तर स्टेज होतं ते हक्काचं...मैत्रिणी जमवायच्या आणि नाच काय, नाटक काय...नुसता धांगडधिंगा" काही क्षणांसाठी शेखरही हरवला मागच्या दिवसांत. ही संधी साधत मधुराने विचारलं,
"म्म...बघूया का कोणाला जमतंय का वर चढवायला ते?"
"नको गं मधू..." तिच्या खांद्यावर हळुवारपणे थोपटत तो म्हणाला,"खरंच तो चढवणं आवाक्याबाहेरचं आहे. आता लाईट वेट सामानाचा जमाना आहे. इतक्या जड वस्तू उचलायची सवय राहिली नाहीये कोणालाच. गावात जाताना ते जुनं सामान घेणारे बसतात ना, त्या नाक्यावर जाऊन विचारतो," असं म्हणत शेखरने गाडी बाहेर काढलीही.
आता आपण नक्की विकणार पलंग, याची खात्री झाली नि मधुराचे डोळे भरून आले. गळ्याशी आलेला आवंढा गिळत तिने घराचं दार लावलं. कामात मन गुंतवायचा प्रयत्न करू लागली.
फर्निचर विकत घेणारा शेखरबरोबर आला...पलंगाची नीट पाहणी केली. मग घासाघीस करत, त्याच्या वजनदारपणाचं कारण पुढे करत, भाव पाडून सौदा केला. खरं तर त्याचा भाव करण्याची शेखरची अजिबात इच्छा नव्हती. पण एकदा विकायचा ठरल्यावर इमोशनल होण्यात अर्थ नाही, हे त्याला कळत होतं. ज्या दणकटपणाचं आणि अवाढव्य आकाराचं इतके वर्षं कौतुक झालं, आज तीच वैशिष्ट्यं त्याच्या सौद्यामधला मोठा अडसर ठरत होती. फर्निचरवाला मोठी हातगाडी घेऊन आला नि त्यावर पलंग चढवून घेऊन गेला.
"मधू...त्याला सगळ्यात पुढे मांडायला सांगितलाय गं पलंग...येणा-या जाणा-याचं लक्ष जाईल अशा ठिकाणी. तुला सांगतो, कोणीही हसतहसत घेऊन जाईल त्याला घरी", घरात शिरता शिरता शेखर बोलला. ते ऐकून तिच्या उदासल्या मनाला थोडी टवटवी आली. "चांगल्या घरात लवकरात लवकर जाऊदे बाबा", स्वतःशीच पुटपुटली.
पुढचे दोन-तीन दिवस घर लावण्यात तिची उदासी हळूहळू मावळली. सगळं सामान मनाजोगं लावून झाल्यावर घरातली माणसं आपापल्या कामांना पांगली. मधुराची मात्र आणखी 2 दिवस रजा होती. सुट्टीतच भाजी, वाणसामान भरून ठेवावं म्हणून तिने स्कूटी बाहेर काढली आणि बाजाराच्या दिशेने जाऊ लागली.
घरापासून काही अंतरावर पोचली नाही तोच, तिला तो दिसला. त्यांचा पलंग. रस्त्यावरच मांडलेल्या बाकीच्या जुन्या फर्निचरमध्ये भारदस्तपणामुळे अगदी उठून दिसत होता. त्याच्या अनपेक्षित दर्शनाने ती आनंदली. 'कसा आहेस बाबा?' डोळ्यानेच विचारपूस करत, क्षणभर त्याच्यासमोर थांबली.
'आपल्या वाटेवरच आहे, म्हणजे निदान रोज दिसेल तरी.' मनात आलेल्या विचारानेही तिला छान वाटलं आणि स्वतःच्या हळवेपणाचं हसूही आलं. मनात म्हणाली, 'असं काही घरात सांगितलं तर, सगळे किती चेष्टा करतील आपली.'

मग दोघांची नजरभेट रोजचीच होऊन गेली. त्याच्या मुक्कामाचं ठिकाण आलं की तिच्या स्कूटीचा वेगही नकळत मंदावू लागला. एके दिवशी धूळमाखलं त्याचं रूप पाहिलं आणि ती तिरिमिरीतच स्कूटीवरून उतरली. मांडून ठेवलेल्या सामानावर देखरेख करत पलंगावरच आडव्या झालेल्या बाईला तिने विचारलं, "मावशी, साफ का नाही हो करत हे सामान? किती धूळ बसलीय यावर, कोण विकत तरी घेईल का ते अशाने?" मधुराचा हात नकळत पलंगाच्या कडेवरून फिरू लागला.
अचानक समोर येऊन, अशी अनपेक्षित हजेरी घेण्यामुळे राखणदार वैतागलीच. "अवो ताई , सामान रस्त्यावर ठिवलंय तं माती बसनारच की. इतक्या सामानाची कशी करनार सफाई? तुमाला घ्यायचाए का ह्यो बेड? तर त्याला न्या घरला आन करा त्याची सपाई...अक्षी सरप लावून करा " तिच्या त्रासिक स्वराने मधुरा भानावर आली. 'अापण कोणत्या अधिकारात तिला असा जाब विचारू शकतो? ज्या दिवशी पैशाचा व्यवहार झाला तेव्हाच याच्यावरचा आपला अधिकार संपला', तिने स्वतःची समजूत घातली.
अधिकार संपला असला तरी मनातली माया मात्र तशीच होती, ती पुन्हा पुन्हा त्याच्याकडे घेऊन येत होती. 'आपल्या घरी होता तेव्हा कशी बडदास्त ठेवायचो. दर दोन दिवसाआड त्याच्यावरून नुस्तं ओलं फडकं फिरवलं तरी किती चमकायला लागायचा. भारदस्त होताच, आपल्या नेटक्या ठेवण्याने राजबिंडाही दिसायचा. आता पार धूळमाखलं शेंबडं पोरकं पोर दिसतोय.'  राहूनराहून तिच्या मनात येत राहिलं.

एकीकडे तो दिसण्याचा आनंद होता आणि दुसरीकडे त्याचं असं पोरक्या पोरागत, कोणी तरी घरी नेण्याची वाट बघत रस्त्यावर उभं असणं, अस्वस्थही करत राहिलं तिला.
महिन्याभराने पावसाला सुरुवात झाली आणि पलंगावरची सगळी धूळ धुतली गेली. त्याचं साफसुतरं झालेलं रूप पाहून मधुरा सुखावली.
पावसाने जोर धरला तसं तिथे मांडलेलं लाकडी फर्निचर आडोशाला ठेवलं गेलं. तो लोखंडी पलंग मावेल असा आडोसाही नसल्याने त्याला तसंच पावसात भिजत उभं ठेवलं गेलं. आता तो जास्तच एकाकी, बापुडवाणा दिसू लागला.
ते पाहून मधुराच्या मनाची घालमेल सुरू झाली. शेवटी एक दिवस ती पुन्हा थांबलीच त्याच्यापाशी. एक बाप्या रस्त्यावरची गर्दी न्याहाळत, त्याच्या
शेजारी खुर्ची टाकून बसला होता.
"दादा, त्याची नीट देखभाल जमत नसेल तर विकून का टाकत नाही तुम्ही?" तिने विचारलं. तिच्या आवाजातला वैताग लपत नव्हता.
"विकायसाटीच तर कवाचा ठिवलाय ना ताई...पन गि-हाईकच भेटत न्हाई याला.  येवडा मोटा पलंग ठिवाया घर नको का तसं...हितं तर समदी लहान घरं असत्यात. मंग कोन नेनार याला?" तो त्रासून म्हणाला. त्याच्या बाजूने तो ही बरोबर होताच..."माजंच पैकं अडकल्यात. बगितला तवा मला वाटलं की यवडा मजबूत पलंग हाये, कसाबी जाईल. पन कसचं काय! ह्यो बाबा आजून हितंच हुबा. माजाबी पैसा आडकलाय...न्हाई गेला आजून चार दोन दिसांत तर दिऊन टाकीन भंगारात..."
त्याचा इरादा ऐकला आणि मधुराच्या चेह-यावरचे भाव बदलले. भंगाराच्या दुकानात मोडून पडलेला पलंग तिच्या डोळ्यासमोर आला. कुठल्याशा तंद्रीत स्कूटीला कीक मारत ती घराकडे वळली. कपाटाच्या वरच्या कप्प्यात शिफ्टिंगच्या वेळी आणलेलं भलामोठं प्लास्टिक घडी करून ठेवलं होतं. ते घेऊन ती आली. पलंगाजवळ बसलेल्या माणसाच्या हातात ठेवत म्हणाली,"दादा, हे घालून ठेवा याच्यावर. म्हणजे पाण्यात भिजून गंजणार तरी नाही. आणि प्लीज काही झालं तरी भंगारात देऊ नका. मी शोधते त्याच्यासाठी गि-हाईक"
या बाईला इतकं प्रेम का या पलंगाबद्दल,  ते त्याला कळेना. त्याच्या चेह-यावरचं प्रश्नचिन्ह मधुराने वाचलं. ती म्हणाली,
"दादा, हा आमच्या घरूनच आलाय इथं.  किती वर्षं एकत्र राह्यलो आम्ही. नव्या घरात चढवता आला नाही म्हणून नाईलाजाने विकावा लागला. त्याला असं धूळ खात, पाऊस झेलत पोरक्यासारखा उभा बघून जीव तुटतो माझा. नातं आहे हो माझं त्याच्याशी", बोलता बोलता मधुराचा गळा दाटून आला...ती निघाली.... तिचं सगळं बोलणं नीट समजलं नाही तरी त्यातले भाव पोचले होते त्याच्या काळजापर्यंत. पलंगावरचं पाणी  हळूवारपणे निपटून काढत त्याच्यावर प्लास्टिकचं पांघरूण अंथरताना तो म्हणाला,"नशीबवान हायेस लेका तू. हितं आपल्या मान्साला जीव लावनारी
न्हाई -हायली या दुनियेत...आन् तिचा जीव गुतलाय तुज्यासारक्यात...अजबच हाये!" 
- अश्विनी मयेकर


Thursday, 20 December 2012

पोरी, जरा जपून...
पोरी, जरा जपून
दोन पायांची श्वापदं फिरतायत अवतीभवती
आणि त्यांच्यासाठी पिंजरे बनवणं, त्यांना बांधून घालणं
हे येरागबाळयाचं काम नाही...
खरं तर कोणालाच जमणार नाही गं ते!
बाईला फक्त मादी समजणारी ही श्वापदं कधी जन्माला आली?
...कशी आपल्यातच वाढत गेली...?
हे कळलंच नाही, परग्रहावर जायची स्वप्नं पाहणाऱ्या इथल्या माणसाला...
...तेव्हा तूच करायचं आहेस स्वत:चं रक्षण...जमलं तर...
नाहीतर, भोग वाटयाला आलेले भोग...!
स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्या दूरदृष्टीच्या 'शहाण्या' दांपत्यांना
सरकार पुरस्कार जाहीर करणार आहे म्हणे लवकरच....
एका निष्पाप जिवाचा या नरकातला प्रवेश रोखला म्हणून...
मी तर तेवढीही शहाणी नव्हते बघ...
तुला जन्म देऊन मोकळी झाले....
माणूस म्हणून वाढवायच्या खुळया नादात
माणसं संपत चालली आहेत इकडे लक्षच गेलं नाही माझं...
आता माझ्या या चुकीचं प्रायश्चित्त तू घ्यायचंस...
आजच्या दुनियेचा हाच तर रिवाज आहे...!
                                                                      -अश्विनी

Wednesday, 6 June 2012

उत्सवत्याच्या येण्याचा सांगावा तिच्यापर्यंत पोचलाय हे सकाळीच उमगलं....
निरोपाचे दोन-चार शिंतोडेही काय कमाल करु शकतात,
 हे सर्वदूर पसरलेल्या तिच्या गंधाने समजलं...
किती युगं लोटली तरी भेटीतली उत्कटता, मिलनाची आतुरता
युगाच्या सुरुवातीला होती तशीच...तितकीच...अमीट
ही किमया कोणाची...?
विरहातही भेटीची आशा जिवंत ठेवणाऱ्या तिची, की
दिलेलं वचन पाळण्याकरता तिच्या ओढीनं धाव घेणाऱ्या त्याची?
आता ढोल-गजराच्या साथीनं तो मोठया ऐटीत येईल
आणि त्याच्या प्रियेला आलिंगन देईल...
आपल्या सर्वांच्या साक्षीनं सर्जनाचा नवा उत्सव सुरू होईल
-अश्विनी Friday, 11 May 2012

क्षण निरोपाचा...


घरटयाच्या कठडयाशी येऊन भवतालच्या परिसराकडे अपार उत्सुकतेने पाहणाऱ्या त्याच्या इवल्याशा पण चमकदार डोळयांनी माझं लक्ष वेधून घेतलं. 'अगं बाई, किती लगेच मोठी झाली ही आणि धीटही...आणखी काहीच दिवस आपल्यासोबत.. इवल्याशा पंखांमधे पुरेसं बळ आलं, उडण्याचं शिक्षण मिळालं की आकाशात झेप घेतील... ' मोठी झाल्याचा आनंद आणि विरहाच्या क्षणाची लागलेली चाहूल दोन्ही एकाच वेळी मनात आलं आणि मन कातर झालं...'कसं दिसेल हे सुनंसुनं घरटं...? गेले महिनाभर  त्या इवल्याशा घरात मूर्तिमंत चैतन्य नांदत होतं...या अनपेक्षित आणि गोजिरवाण्या पाहुण्यांनी आमच्या आयुष्यातही अनोख्या आनंदाचे चार क्षण आणले होते. हे सगळं संपणार तर...? 

'आपल्या बागेतलं घरटं सोडून जाणार म्हणजे त्यांच्या जन्मदात्यांपासूनही दूर जाणार की? ' या अटळ सत्याची जाणीव झाली आणि मन अधिकच उदास झालं...त्या दोघांच्या संगोपनाच्या कालखंडाची मी एक साक्षीदार होते. अंडी उबवण्यापासून त्यांनी या दोन जिवांची घेतलेली काळजी मी पाहिली होती. दोघांनी आलटून पालटून दिलेली मायेची ऊब, घरटयाच्या परिसराची केलेली राखण, कावळयासारख्या शत्रूपासून आपल्या पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी ठेवलेला कडेकोट पहारा..दिसायला चिमणीचं मोठं भावंडं वाटावं असा हा नर्तक पक्षी, पण कावळयाशी ते  ज्या त्वेषाने भांडत असत ते पाहताना  त्यांच्या इवल्याशा कुडीचाही पाहणाऱ्याला विसर पडत असे. आपल्या पिल्लांवरची अपार माया त्या जिवांना कावळयासारख्या, त्यांच्यासमोर बलाढय दिसणाऱ्या शत्रुशी दोन हात करण्याचं बळ देत होती. अंडयावरचे तपकिरी रंगाचे ठिपके वाढू लागले आणि गडदही होऊ लागले तेव्हा माझ्या लेकाने मला सांगितलं, 'आई, आता लवकरच पिल्लं बाहेर येतील.' यापूर्वी कधी हा अनुभव घेतला नसल्याने मनात अपार उत्सुकता आणि हुरहूर दाटली होती. आणि अगदी दोन दिवसांतच पिल्लांनी दर्शन दिलं..पालीचं पिल्लू वाटावं इतक्या नाजूक शरीराचे तो दोन कोवळे जीव पाहिले आणि औत्सुक्य-आनंदाची जागा काळजीने घेतली. अक्षरश: बोटभर आकार आणि अतिकोमल काया... 'कस{ वाढवतील या जिवांना आणि सतत घिरटया घालणाऱ्या त्या कावळयाचं काय? त्याला लागली असेल का यांच्या जन्माची खबर? इतकं कोवळं मांस म्हणजे त्याला मेजवानी..'माझ्या मनात नुसतं काहूर माजलं..आधी नुसती अंडयांना ऊब द्यायची होती. आता उब देण्याबरोबरच खाऊपिऊ घालायचं होतं, बाहेरच्या जगात वावरण्याला लायक करायचं होतं..पंख्यासारखे पंख पसरत आकाशात डौलाने उडायलाही शिकवायचं होतं. 'इतकं सगळं जमेल त्यांना?' पक्षीजगताच्या तोकडया अनुभवामुळे मी अधिकच चिंतातुर बनले होते. काही दिवसांतच माझ्या शंका आणि चिंता दूर पळाल्या. कावळयाशी ते पूर्वीपेक्षाही त्वेषाने भांडत होते. या भांडणात एक दिवस त्यातल्या वडिलांचा पंख कापला गेला, तरी त्यांनी कर्तव्यात कसूर केली नाही. आपल्या इवल्याशा चोचीत बारीक किडे आणणं आणि ते या पिलांच्या मुखात घालणं हे काम सतत चालू असे. पिलं जन्माला आली की लगेच दृष्टी येत नाही. डोळे उघडायला काही दिवस जातात. पण त्या आधीही आपले आईवडील  आपल्यासाठी खाऊ घेऊन आले आहेत हे त्यांना नेमकं समजायचं, ते घरटयापाशी आले की आपोआप त्या दिशेने तोंड करुन ते आपला इवलासा 'आ' वासायचे. हे  सारं प्रत्यक्ष बघण्यातही मौज होती. आनंद होता. त्यांना दिसामाशी वाढताना पाहणं सुखावणारं होतं. हळूहळू गुलाबी त्वचा करडया-तपकिरी केसांनी झाकली गेली. डोळे उघडले, नजर आली. इवल्याशा पण टाकदार चोचीचा आकार दिसायला लागला. पिलं मोठी होताना त्यांना सामावून घेण्यासाठी ते घरटंही रुंदावत गेलं. काळजी वाटावी अशा अतिकोमल कायेपासून एका गोंडस-गोजिरवाण्या पिल्लांपर्यंतचा त्यांच्या वाढीचा प्रवास पाहताना खूप समाधान मिळालं. यासाठी त्यांच्या जन्मदात्यांनी घेतलेली जिवापाड मेहनत आणि डोळयांत तेल घालून घेतलेल्या काळजीला खूप चांगलं फळ आलं होतं. आता ती पिल्लं धीटपणे घरटयाबाहेर डोकावताहेत, त्याच्या कडेवर उभं राहण्याचं धाडस करताहेत. हळूहळू उडण्याचं प्रशिक्षण चालू होईल.
ज्या एकझोऱ्याच्या झाडावर हे इवलंसं घरटं बांधलं आहे, त्यालाही बहर येतो आहे. गुलाबी रंगाच्या नाजूक फुलांचे घोस त्याच्या अंगोपांगी लगडू लागले आहेत. हा त्याचा दरवर्षीचा बहराचा मोसम असला तरी ही नर्तक पक्षाला निरोप देण्यासाठी केलेली तयारी आहे असे वाटते आहे. या साहचर्याने त्या झाडालाही काही दिलं असेलच ना? त्याची कृतज्ञ फेड करण्यासाठी तर ही फुलांची आरास निरोपासाठी मांडली नसेल?
आणि त्या पिल्लांचे जन्मदाते...? बाकीच्यांना जाणवलेला निरोपाचा क्षण त्यांच्याही लक्षात आला असेलच की... त्यांचं दिसामाशी वाढणं म्हणजे आपल्यापासून दूर जाण्याच्या दिशेने एक पाऊल टाकणं हे त्यांना पहिल्या दिवसापासून कळलं असावं...स्वत:च्या जिवापल्याड पिल्लांचं रक्षण केलं, मायेची ऊब दिली पण म्हणून विरह टळू  शकतो थोडाच...? हे स्वीकारायची त्यांची तयारी असावी असं त्यांच्याकडे पाहून वाटतंय. किती समंजस दिसताहेत दोघंही..आणि कृतकृत्यही...एक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याचं समाधान असेल त्यांच्या मनात... मायेच्या पाशात पिल्लांना गुंतून न ठेवता त्यांना मुक्त आकाशात उडू देण्यासाठी त्यांनी मन घट्ट केलं असावं, असंही मला वाटतं आहे. इथून उडाल्यावर कदाचित पुन्हा गाठ पडणारही नाही.  आकाशात विहार करताना जर समोर आले तर ओळख पटत असेल आपल्या जन्मदात्यांची? कुणास ठाऊक! पण या चिंतेची सावली आज त्यांच्या चेहऱ्यावर नाही. सहवासाचे जे चार क्षण नियतीने नशिबी लिहिले आहेत त्यातलं सुख लुटावं, आनंद घ्यावा आणि निरोपाची वेळ झाली की 'शुभास्ते पंथान:' म्हणून हसतखेळत निरोप द्यावा असं सांगणारे भाव त्या जन्मदात्यांच्या चेहऱ्यावर वाचता येताहेत...आणि मी किती खुळी! जमेल ना यांना पालकपण असा विचार करत होते!..उलट  गेल्या महिन्याभरात त्यांनीच खूप शिकवलं आहे...माणसांपलिकडच्या जगात पालकपण कसं निभावलं जातं याचं दर्शन मला घडवलं आहे. त्यांना हसतमुखाने निरोप द्यायचा इतकंच आत्ता ठरवलं आहे. खरं तर मी आणि माझी बाग आता पुढच्या सृजनसोहोळयाकडे डोळे लावून बसलो आहोत...आम्हांला भरभरुन देणाऱ्या अशा आणखी एका सोहोळयाकडे!
-अश्विनी

Friday, 24 February 2012

'मूक'नायककिती माणसं असतात आपलं आयुष्य घडवणारी...कोणताही 'पाठ घेताकोणताही 'सल्ला देताही खूप काही शिकवणारी...सहवासातून अनेक मूल्यांची रुजवण करणारी...आपल्या चांगल्या आणि वाईटदोन्ही दिवसांत ही माणसं आपल्या अवतीभवती त्यांच्या कामात गर्क असतात. पण त्यांचं नुसतं 'असणंमरगळ आलेल्या मनाला उभारी देतं आणि सुखाच्या क्षणी बेहोश होण्यापासून परावृत्त करतं. फक्त आजूबाजूच्या गोतावळयात त्यांची 'नेमकीओळख आपल्याला पटावी लागते. (आम्हां भावंडांचं भाग्य कीअशा माणसांना ओळखण्याची नजर आमच्या आईवडिलांनी दिली आणि त्यांच्याबद्दल कायम कृतज्ञ राहण्याची वृत्ती आमच्यात रुजवली.)
माझ्यासाठी आण्णांचं स्थान अशांमधे अग्रभागी...आण्णा म्हणजे डॉसिताम्हणकरज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य...संस्थापक संचालक कै.आप्पा पेंडसे यांच्या निधनानंतर काही काळ संचालकपदाची म्हणजे प्रमुखपदाची धुरा सांभाळणारे... कसोटीच्या काळात संस्थेचं खंबीर नेतृत्व करणारे आणि नियोजित संचालक येताच त्यांच्या हाती कार्यभार सोपवूनकार्यकर्ता वृत्तीने पुन्हा नव्या कामात स्वत:ला झोकून देणारे...मी प्रबोधिनीचं काम करायला लागले तेव्हा बऱ्याच ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाबद्दल ऐकलं होतंवेगवेगळया कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यापैकी काहींचं दुरुन दर्शनही झालं होतंया कामातली मुळाक्षरं गिरवणारी माझ्यासारखी कार्यकर्ती पुढे जाऊन बोलणं ही म्हटलं तर अशक्य गोष्ट होती'त्यांच्याशी बोलावंत्यांचं काम जाणून घ्यावंसं तर वाटतंय पण सर्वांसमोर जायचा संकोच तसं करु देत नाही', मनातल्या या उलघालीवर मी तोडगा काढला. प्रबोधिनीच्या कामाबरोबर मी पत्रकारही असण्याचा इथे उपयोग झाला.
किल्लारीच्या भूकंपाची झळ बसलेल्या हराळी या गावात प्रबोधिनीचं नवं काम उभं राहत होतं. शेतकऱ्यांच्या मुलांसाठीची निवासी शेतीशाळा. या वैराण वाळवंटात आण्णांच्या कल्पक नेतृत्वातून नंदनवन आकार घेतंय हे ऐकून होते..ते बघण्यासाठी आणि त्यावर दीर्घ लेख लिहिण्यासाठी मी 10 वर्षांपूर्वी हराळीत पोहोचले. ती माझी आणि आण्णांची पहिली भेट. त्यांच्याबरोबर त्या प्रकल्पावर असणाऱ्या प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या लताताईया दोघांनाही प्रथम भेटत होते. लताताईंचं बोलणं अतिशय आपुलकीचंथेट काळजाला 
भिडणारं...आमच्यामधलं सर्व प्रकारचं 'अंतरपुसून टाकणारं. त्यामुळे त्यांच्याशी अगदी लगेचच नातं जुळलंत्यामानाने आण्णा मितभाषी. अखंड कामात व्यग्र आणि खरं तर कामातूनच संवाद साधणारे. मात्र जे काही शब्द बोलतील ते आठवणीत राहावेत असे. त्यावेळी सत्तरीच्या उंबरठयावर असलेल्या आण्णांचा दिवस पहाटे चारच्या सुमारास सुरू होत असे आणि रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास संपत असे. )आजही या दिनक्रमात बदल झालेला नाही.) जागृतावस्थेतला बहुतेक सर्व वेळ हा फक्त आणि फक्त कामासाठीकामात बदल हाच विरंगुळा. मी हे सर्व पाहत होते आणि थक्क होत होतेनकळतस्वत:च्या वाया चाललेल्या वेळेची तुलना त्यांच्या कार्यमग्नतेशी करत होते. शांत राहूनही दबदबा कसा असू शकतो याचा वस्तुपाठ म्हणजे आण्णा'दमलोथकलोया शब्दांना हद्दपार केलेलं त्यांचं जगणं आजूबाजूच्या अल्पशिक्षित-अशिक्षितांनाही प्रेरणा देणारं. 'आपण नाही तरआपलं काम बोललं पाहिजे', ही शिकवण आण्णांच्या सहवासानं दिली. आमच्यात काही शब्दांची देवाणघेवाण व्हायची ती जेवणाच्या टेबलावर. त्यात घरच्यांची चौकशीमाझ्या कामाचं स्वरुपमी हराळीत काय पाहिलं याची चौकशी असे. आणखी काय पाहायला हवं, कोणाशी बोलायला हवं असं सुचवणं असे. दर्जेदार शिक्षणाचं कायमचं दुर्भिक्ष आणि पुरेशा पावसाअभावी वैराण वाळवंट असलेला हा भागत्याचा आण्णा-लताताईंनी केलेला कायापालट बघून मी थक्क होत होतेअतिशय कमी पावसाच्या प्रदेशातमूळच्या शेतकरी नसलेल्या पण प्रयोगशील वृत्तीच्या आण्णांनी जे उभं केलं आहे ते प्रत्यक्ष पाहायला हवं असंचस्वप्नवत वाटणारी गोष्ट सत्यात आणणं म्हणजे  हराळीचा प्रकल्प आणि त्याचे मुख्य शिल्पकार आण्णा. आज 'समृध्दीची प्रसन्न झुळूक अनुभवणाराहा प्रदेश म्हणजे आण्णांच्या वयाची साठी ओलांडल्यानंतर उभ्या केलेल्या कामाचं मूर्तिमंत प्रतीक! हाती घेतलेलं प्रत्येक काम हे देखणं आणि सर्वांच्या हिताचा विचार करुन करणं हे त्यांचं वैशिष्टय आहे. खरं तर उठल्यापासून रात्री निजेपर्यंत ते जे काही करतात ते केवळ समाजासाठीच; पण तेही नेटकंपरिपूर्ण करण्याचा त्यांचा आग्रह असतो...
एका वर्षी मी हराळीचं वार्षिक वृत्त करण्यासाठी तिथे आठवडाभर मुक्कामाला होते. वार्षिक वृत्ताच्या निमित्ताने तिथल्या कामाचा वर्षभराचा आढावा घ्यायचा होतातोही वेगवेगळया विभागात काम करणाऱ्या माणसांशी बोलून...अगदी स्वयंपाकघरात काम करणाऱ्या मावशांचं मतही तितकंच मोलाचं असणार होतं. आपल्या कामात त्यांना आलेले अनुभव त्यांनी सांगावेत अशी अपेक्षा होती. सर्वच जण अगदी मोकळेपणी बोललेभरभरुन बोलले. कामातून मिळणारा आनंदआण्णा-लताताईंसारख्या ज्येष्ठांकडून मिळणारी आपुलकीची वागणूकप्रत्येक कामाच्या नियोजनावर आण्णांचं असलेलं बारीक लक्ष आणि त्याच वेळी जबाबदारी सोपवलेल्या व्यक्तीला वाढायला दिलेली 'स्पेसत्यांच्या प्रांजळ निवेदनातून माझ्यापर्यंत पोचत होतीआण्णांच्या व्यक्तिमत्त्वाचं कॅलिडोस्कोपिक दर्शन घडत होतं. अनेक पुरस्कार ओवाळून टाकावेत असं काम करणारा हा महात्मा कसलीही अपेक्षा  करता महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात शांतपणे मनुष्यघडणीच्या कामात व्यग्र आहे. अनेकांपर्यंत त्यांचं मोठेपण अजून पोचलेलंच नाही आणि त्याची आण्णांना तमाही नाही. प्रबोधिनीचा हा जो प्रकल्प उभा आहे त्याचे आपण मालक नाही तर 'व्यवस्थापकआहोतत्याच्यावर आपला मालकी हक्क नाही याची कृतीतून जाणीव करुन देणारे आण्णा. अगदी एक लहानसा प्रसंग याची साक्ष देतोया मुक्कामाच्या वेळी मी निघाले तेव्हा मला तिथल्या नर्सरीतून एक रोप भेट देण्यात आलं आणि माझ्या आवडीची आणखी दोन रोपं मी घेतली. माझ्या पिशवीत तीन रोपं पाहिलेल्या आण्णांनी मला निरोप पाठवला, ''ताईंना म्हणावं कीएक रोप तुम्हांला हराळीची भेट म्हणून दिलं आहे. बाकीच्या रोपांचे पैसे द्यावे लागतील.'' खरं तर हा निरोप येण्याआधीच मी पैसे दिले होते पण आपला एक लहानात लहान कार्यकर्ताही वावगं वागू नये यासाठी ते किती दक्ष असतात याचं दर्शन मला घडलं.
व्यवहारात काटेकोर असणाऱ्या आण्णांचं आणखी एक रुप मला त्यावेळी दिसलं. आमच्या मुक्कामाच्या ठिकाणाहून खाली येण्यापूर्वी मी माझी बॅग पॅसेजमधे ठेवली आणि खोलीचं दार बंद करायला वळले. तेवढयातमला निरोप द्यायला आलेल्या आण्णांनी अगदी सहज माझी ती अवजड बॅग उचलली. माझं लक्ष जाताच मी घाईघाईने बॅग घ्यायला धावले, '' अहो,किती जड आहे ही बॅग. खाली कशा न्याल तुम्ही?'' मला म्हणाले. त्यांच्या स्वरातली आपुलकी माझ्या हृदयाला स्पर्शून गेलीमी कसंबसं इतकंच म्हटलं, ''आण्णाप्लीज लाजवू नका मला...मी माझी बॅगही उचलू शकले नाही तर काय शिकले तुमच्याबरोबर राहून?'' डोळयांत जमा झालेल्या अश्रूंनी आण्णांसमोर वाकलेपायावर डोकं ठेवून नमस्कार केला. तेव्हा हा मूकनायक शांतपणे हात जोडून मला निरोप देत होता...
-अश्विनी