Friday, 30 September 2011

बकुळफुलं....


बकुळफुलं हे आमच्या मैत्रीचं प्रतीक आहे. कितीही सुकली तरी सुगंध जिची साथ सोडत नाही आणि जिचं सौंदर्य कधी उणावत नाही अशी बकुळ...
22 वर्षं झाली तिची ओळख होऊन...एम.ए.ला आम्ही दोघी एकत्र होतो...दुपारच्या लेक्चर्सना धावतपळत, धापा टाकत ती यायची...बहुतेक वेळा अगदी लेक्चर सुरु व्हायच्या क्षणी...आणि ते संपल्यावर कर्जत गाडी पकडण्यासाठी गडबडीत निघून जायची...शिकताशिकता एकीकडे तिची नोकरीही चालू होती....बोलण्यातून हळूहळू कळत गेलं... साहित्याची तिला असलेली जाण आणि तिचं कमालीचं साधं राहणं यामुळे ओळखीच्या पलिकडे हे नातं जावं असं मला अगदी मनापासून वाटत असे...पण तो योग यायला दुसरं वर्ष उजाडावं लागलं...परिक्षेचा अभ्यास एकत्र करण्याचा प्रस्ताव तिनं समोर ठेवला...मी आनंदानं होकार दिला.
एकत्र अभ्यास करताना मला जाणवलं की, ती हाडाची शिक्षिका आहे...आणि शिकवण्याची तिची पध्दतही अनोखी, समोरच्यावर विलक्षण प्रभाव पाडणारी आहे. ती भेटेपर्यंत मलाही कविता आवडायच्या...कळायच्याही..पण कवितेच्या अंतरंगात घुसायचं म्हणजे काय हे तिच्यामुळे समजलं...कवितेचे पदर उलगडून दाखवण्याची तिची पध्दत लाजवाब होती. आणि हा गुण तिनं कमावलेला नव्हता, तिच्यात ते उपजतच होतं. तिच्यामुळे मी कवितेच्या अधिक जवळ गेले.
संवेदनशीलता हा आमच्यातला समान दुवा...एखाद्या विषयावर बोलताना एकाच वेळी दोघींच्या डोळयात पाणी तरळायचं आणि आमच्या हळवेपणाचं आम्हांलाच हसू यायचं...'कधी सुधारणार गं आपण?...आजकाल चालत नाही इतकं हळवं राहून... ' हे दोघींनाही समजत होतं पण कृतीत मात्र येत नव्हतं ..आजही त्यात फरक पडलेला नाही.
अभ्यासाच्या त्या 2 महिन्याच्या काळात कधी आम्ही एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी झालो ते कळलंही नाही...बघता बघता दुसरं वर्ष संपलं आणि आता रोजची भेट होणार नाही याची जाणीव झाली...असं दूर जाणं अटळ  आहे हे कळत असूनही ते दुखवून गेलं, अस्वस्थ करुन गेलं...हळूहळू भेटी महिन्यांनी होऊ लागल्या...कधी कधी असं व्हायचं की, आजूबाजूला असलेल्या गर्दीत दोघींचं असं बोलणं व्हायचंच नाही...खूप काही सांगायचं असायचं एकमेकींना, ते तसंच मनात ठेवून निरोपाचा क्षण समोर येऊन उभा राहायचा... 'याला काय भेट म्हणायची का गं?...नुसत्या दिसलो एकमेकींना...आता भेटू कधीतरी आजूबाजूला गर्दी नसताना.. असं एकमेकींना समजावत नाराज मनाने निरोप घ्यायचा...
मग कधीतरी खरंच दोघींना सोयीची वेळ पाहून भेटीचा दिवस ठरवायचा.. ' बाहेरच भेटू..म्हणजे निवांत आणि पोटभर बोलता येईल'..त्या भेटीचे वेध लागायचे...खूप दिवसांनी भेटतोय तर काहीतरी नेऊया भेट असं वाटून दोघीही एकमेकींसाठी भेट घेऊन जायचो...काही बोलण्याआधी हातावर गजऱ्याची पुडी ठेवली की ती म्हणायची, 'अगं, मीही तुझ्यासाठी गजरा आणला आहे...असं म्हणून तीही पुडी माझ्या हातावर ठेवायची...दोघींच्याही पुडीत बकुळीचा गजरा असायचा...या योगायोगानं हसूही यायचं आणि रडूही...तिने दिलेला गजरा मला मी आणलेल्या गजऱ्यापेक्षाही नेहमीच अधिक सुगंधी वाटायचा...मग गप्पांना सुरुवात व्हायची...आता आमची भेट वर्षांच्या अंतराने होते. मात्र, कितीही वर्षांनी भेटलो तरी काय बोलावं एकमेकींशी हा  प्रश्न कधीच पडत नाही. आता काय बोलावं असं कधी मनात येतच नाही. दोन भेटींमधलं अंतर वाढत चाललंय, पण मैत्रीत अंतर पडलेलं नाही.. मैत्रीतली उत्कटता आणि ओढ तेवढीच आणि तशीच आहे...बकुळीच्या सदासुगंधित फुलासारखी!
...अश्विनी

Wednesday, 28 September 2011

मागणं...साधं शाळेत शिकण्याची तिची इच्छाही नियतीनं कधी पूर्ण केली नाही...तरीही आयुष्यभर नवं काही शिकण्याचा  तिचा उत्साह तसूभरही उणावला नाही!
समाजाच्या उपयोगी पडावं, आपल्याकडे जे देण्यासारखं आहे ते सर्वांमधे वाटून टाकावं याची कोण आवड होती तिला...पण अंगात बळ होतं तेव्हा घराच्या व्यापातापात इतकी गुरफटलेली होती की मनात असूनही तिला समाजापर्यंत  कधी पोचताच आलं नाही.
वरवर करडया, खरं तर रागीट व्यक्तिमत्त्वाच्या तिचे हात लांबसडक आणि लोण्याहूनही मऊ होते. तिच्यातल्या कलासक्त मनाची साक्ष होती ती... तिनं जे काम केलं ते देखणं आणि लक्षवेधीच केलं. मग तो स्वयंपाकातला एखादा पदार्थ असेल किंवा भरतकामाचा नमुना किंवा स्वान्तसुखाय केलेलं लेखनही....
घराचा उंबरा ओलांडून जर तिला बाहेर पडता आलं असतं तर?....तर तिनं खूप काही केलं असतं. एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून ती नावारुपाला येण्याइतकी तिची नक्कीच क्षमता होती...
पण आयुष्याचं दानच असं पडलं की, यातलं तिला काहीच करता आलं नाही...तरी तिने नशीबाला दोष दिला नाही की स्वत:ची कहाणी लोकांना सांगून कधी सहानुभूती गोळा केली नाही...
शांत राहून संकटाशी दोन हात करण्याचं तिचं कसब अलौकिक होतं...तिच्या कुवतीप्रमाणे ती लढत राहिली.... सतत कार्यमग्न राहणं हे त्यावर तिने शोधलेलं उत्तर होतं...कधीतरी दिवस बदलतीलच हा आशावाद तिला बळ पुरवत राहिला...आणि झालंही तसंच!...दिवस पालटले...समृध्दी येताना बरोबर सुख-समाधान घेऊन आली...तिला आनंद झाला पण तोही तिच्या स्वभावाप्रमाणे तिने संयमाने व्यक्त केला....ज्या साध्या राहणीमानाचा तिने स्वीकार केला होता त्यात समृध्दीतही जराही फरक पडला नाही...अंगाला सोनं लागू दिलं नाही की जरीकाठाची साडी ल्यायली नाही...घरातल्या लेकीसुनांनी मात्र दागदागिने घालावेत, छान रहावं असं तिला वाटत असे...अर्थात्, ही इच्छाही तिने कधी कोणावर लादली नाही.
आयुष्यात अनेक अपमान वाटयाला आले. ते निमूट गिळून पुढे जाण्याचेही प्रसंग आले, पण ती कधी परिस्थितीसमोर लाचार झाली नाही. स्वाभिमानाशी तडजोड  न करता  सत्व आणि स्वत्व तिनं कायम राखलं...सर्वच मुलांची आर्थिक सुस्थिती आल्यावरही, तिने कधी चुकूनही मला पैसे हवे आहेत असं एकाही मुलाला म्हटलं नाही. त्यामागे, लागतील तेव्हा मुलं देतीलच याची जशी खात्री होती तशी तिची निर्मोही वृत्तीही याला कारणीभूत होती.
आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा तिच्या वयाच्या बायका देवधर्म-पोथ्यापुराणात मग्न असत तेव्हाही तिचा कल  वर्तमानपत्रं आणि अन्य साहित्य वाचण्याकडेच होता. 'देवाला दोन हस्तक आणि तिसरं मस्तक पुरतं ...काही लागत नाही बाकी' ही शिकवण तिच्या जगण्यातून तिनं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली.
स्त्री मुक्ती हा शब्दही माहित नव्हता तेव्हा, 'बाईनं कधी कोणाचं मिंधं असू नये, आपल्या पोटापुरतं तरी तिनं कमवायला हवं...अगदी नवऱ्याच्या तोंडाकडे पहायचीही तिच्यावर वेळ येऊ नये'असं तिचं आग्रहाचं सांगणं असे....मुलींनी वेगवेगळया क्षेत्रात केलेले  पराक्रम ऐकले की तिच्या डोळयात एक वेगळाच आनंद असे..अशावेळी शिकण्याची अतृप्त राहिलेली तिची इच्छा उसळी मारुन ओठांवर येत असे..'खरंच, कुठच्या कुठे गेली असती ही...!' त्यावेळी तिचे लुकलुकणारे डोळे समोर बसलेल्या माणसाला अस्वस्थ करत असत...
शिवाजी महाराजांचे गड-किल्ले पहायचीही इच्छा होती तिची. तिच्यात एक जिप्सी दडलेला होता. जो कायम दडूनच राहिला...नशीबानं त्याचं कोडकौतुक करायची कधी संधीच दिली नाही...हे सगळं मनात ठेवून, मात्र कशाहीबद्दल तक्रारीचा एकही शब्द न काढता काही वर्षांपूर्वी तिनं इहलोकीचा निरोप घेतला.
सारं काही सोसूनही जगण्यावर एवढं प्रेम करणारी अशी ही विलक्षण बाई आमची आजी होती. तिच्या सहवासात मोठं होण्याचं भाग्य आम्हांला लाभलं. तिला असं मागितलेलं आवडणार नाही हे ठाऊक असूनही, तिच्यासाठी फक्त एकच मागणं मागायचं आहे. तिच्या नितांतसुंदर पण अतृप्त राहिलेल्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी देवाने तिला पुन्हा जन्म द्यावा. खरं तर तो तिचं खूप देणं लागतो....त्यातलं निदान एवढं तरी त्याने फेडावंच...!
....अश्विनी

Thursday, 15 September 2011

ओळख...

तशी तिची माझी ओळख स्त्री संघटनेच्या कामामुळे झाली. ती अतिशय आनंदी,
प्रचंड बडबडी. संघटनेच्या कामाकडे, वेळ चांगला घालवायचं साधन म्हणून
पाहणारी...बरं, यात लपवाछपवी काहीच नाही...'ते बौध्दिक काम वगैरे काही
सांगू नका, मी आपली खानपान व्यवस्था किंवा पाहुण्यांच्या स्वागताची
जबाबदारी घेईन', असं खुले आम सांगण्यात तिला खरोखरीच कधी संकोच वाटला
नाही. 'इतके वर्षं सामाजिक काम करुनही ही टिपिकल गृहिणीच राहिली, इंचभरही
पुढे सरकली नाही', ही आम्हां जवळच्या मैत्रिणींची खंत...पण त्या आनंदी
जिवाच्या ते गावीही नसे. 'सोसवेल इतकंच सोशल वर्क' हा तिचा दृष्टिकोन,
त्याच्याशी ती प्रामाणिक होती.
सुखी, समाधानी आणि स्वस्थ अशा तिच्या कौटुंबिक आयुष्याला ग्रहण लागलं ते
नवऱ्याला जडलेल्या दुर्धर व्याधीच्या रुपात.. आधीच घरात गुरफटलेली ती मग
अधिकच घराशी बांधली गेली. मात्र, तोपर्यंत अतिशय सुरक्षित आयुष्य
जगलेल्या तिनं, आश्चर्य वाटावं इतक्या कणखरपणे या अरिष्टाचा सामना केला,
तेही चेहऱ्यावरचं हसू मावळू न देता!...आम्हांला बसलेला हा पहिला धक्का!
नंतरची 5/6 वर्षं तिच्या नवऱ्यानं जिद्दीनं दुखण्याशी सामना केला. एखादा
लेचापेचा खचून गेला असता, पण त्याची आजाराशी दोन हात करण्याची ताकद
कौतुकास्पद होती...पण आजारानं दुर्बल होत गेलेलं शरीर थकलं आणि त्यानं या
जगाचा निरोप घेतला. दोघांनीही जेमतेम चाळीशीचा उंबरा
ओलांडलेला...अर्ध्यावरती डाव सोडून तो निघून गेला...
सुन्न मनाने तिला भेटायला गेले...कसा धीर द्यावा याचा विचार करत,
त्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करत...बिल्डिंगच्या आवारात माणसांची प्रचंड
गर्दी!....नात्याची तर होतीच पण त्याही पलिकडे दोघांनी जोडलेला मित्र
परिवार मोठा होता. त्या गर्दीतून वाट काढत मी हॉलमधे पोचले...ती
नवऱ्याच्या निष्प्राण देहाशेजारीच बसून होती. अगदी शांत
चेहऱ्याने...तिच्या डोळयात बायकोपेक्षाही आईचं ममत्व दाटून
आलेलं....मायेनं त्याच्या चेहऱ्यावरुन, केसावरुन हात फिरवत होती....'खूप
सहन केलंस रे...एवढं सोसलंस पण कधी त्रागा केला नाहीस...'आजूबाजूच्यांची
जराही पर्वा न करता तिचा त्याच्याशी संवाद चालू होता...सगळयांच्याच
डोळयात पाणी उभं करणारं ते दृश्य...मी तिच्या शेजारी बसले, मूकपणे तिच्या
पाठीवरुन हात फिरवत...शब्द थिजून गेले होते.
अशीच काही मिनिटं गेली असतील...ती माझ्याकडे वळली, 'तुला घाई नाही ना
जायची?'....अगदी अनपेक्षित प्रश्न...'अगं घाई कशाला असेल?...तू म्हणशील
तितका वेळ बसीन' मी समजावणीच्या स्वरांत म्हटलं. 'बसण्यासाठी नाही गं
विचारत...याचे सगळे अंत्यविधी मी करणारे....तू माझ्याबरोबर स्मशानात
यावंस अशी माझी इच्छा आहे.'...ती असं काही सुचवेल याची मला अजिबात कल्पना
नव्हती...क्षणभर गांगरले, स्मशानात जायचं...इतकंच नव्हे तर विधी होताना
हिच्या जवळ उभं राहायचं या कल्पनेनंच अंगावर काटा आला. 'मी आणखी कुणाला
नाही सांगितलं बरोबर यायला, पण तू यावंस असं मला वाटतंय...'तिने माझ्यावर
टाकलेल्या विश्वासाचीच ती परीक्षा होती. खरं तर, अगदी जवळजवळ राहूनही
अलिकडे आमचं एकमेकींना दर्शनही दुर्मीळ झालं होतं...तिच्या नित्य
संपर्कातला, तिच्या कायम बरोबर असणारा मित्र परिवार त्यावेळीही तिच्या
आजूबाजूला होताच...अशा परिस्थितीत ती मला आग्रह करत होती...वरवर सैलावलले
दिसणारे मैत्रीचे बंध आतून खूप मजबूत आहेत याचा त्या क्षणाला साक्षात्कार
झाला आणि मी तिच्या हातावर थोपटत म्हटलं, 'येईन मी तुझ्याबरोबर...'
एरव्ही भावभावना तीव्रपणे व्यक्त करणाऱ्या तिचं एक वेगळंच दर्शन घडत
होतं...तिच्यात दडलेल्या परिपक्व व्यक्तीला मी पहिल्यांदाच भेटत होते.
आपण किती चुकीचं समजत आलो हिला आजवर, राहूनराहून मनात येत होतं आणि
अपराधी वाटत होतं. अंत्ययात्रा निघण्याची वेळ जवळ आली आणि तिच्या हातातला
मोबाईल वाजला....कॉल तिला अपेक्षितच होता बहुतेक. कारण रींग वाजताक्षणी
ती म्हणाली, 'अगदी वेळेवर आला फोन..' नुकत्याच अमेरिकेला शिकायला
गेलेल्या तिच्या एकुलत्या एका मुलाचा तो कॉल होता. त्याने अमेरिकेला जाऊन
उच्चशिक्षण घ्यावं ही तिच्या नवऱ्याचीच इच्छा होती. म्हणूनच स्वत:च्या
आजारपणातही त्याने मुलाला अमेरिकेला पाठवायची सर्व तजवीज केली होती. तिने
फोन घेतला, 'राजा, वेळेवर केलास बघ फोन...बाबा निघालेच होते
आता...त्यांना अच्छा नाही करायचा?'....अंगावर काटा आणि डोळयांत पाणी उभं
करणाऱ्या तिच्या उद्गारांनी गर्दी स्तब्ध झाली. तिने मगाचच्याच शांतपणे
हातातला मोबाईल नवऱ्याच्या कानाशी नेला...गळयात दाटलेला हुंदका कसाबसा
थोपवत, वडील-मुलांची ती जगावेगळी भेट आम्ही सारेजण पाहत होतो...तिच्या
धैर्याला, तिच्या शांतपणाला मनातल्या मनात नमस्कार करत होतो. जिला
आतापर्यंत सर्वसामान्य समजण्याची चूक केली होती, तिची खरी उंची मला
दिसली...खरी ओळख पटली.
....अश्विनी

Tuesday, 13 September 2011

एकांतवास....खूप दिवस माणसांमधे राहिले की काही काळासाठी एकटीने प्रवास करायला आवडतो मला....आजूबाजूच्या कोलाहलातही आपल्याच मनाच्या तळाशी डुबकी मारायची संधी, निवांतपणा अशा प्रवासातच मिळतो....कारण आजूबाजूला माणसं असली तरी ती माणसं `माझी' नसतात...माझ्या परिचयाची नसतात....मीही त्यांच्या ओळखीची नसते. कुठल्याच प्रतिमेचं ओझं नसल्याने मन पिसासारखं हलकं होऊन जातं. मग बाहेरचा हिरवागार निसर्ग न्याहाळावासा वाटत नाही, हातात इंटरेस्टिंग पुस्तक असूनही ते उघडावंसं वाटत नाही, मोबाईलमधे आवडीची गाणी असूनही ऐकावीशी वाटत नाहीत...नुसतं डोळे मिटून बसावं आणि मनाला स्वैरपणे भटकू द्यावं....हवं तसं बागडू द्यावं...त्यामुळेच अशा प्रवासाचा दिवस जवळ आला की मन फुलपाखरु होऊन जातं!
मात्र ही  `एकटेपणाची' आवड नाही, तर काही काळासाठी जवळ केलेला `एकांतवास' असं त्याला म्हणता येईल...लोकांतात शोधलेला एकांत!  `एकांतात रमणं' ही माझ्यासाठी अल्पकाळाची अवस्था आहे. मनाच्या `सर्व्हीसिंग'साठी असा अल्पमुदतीचा एकांत मला हवासा वाटतो...त्यातून ताजंतवानं व्हायचं ते पुन्हा माणसांमधे राहण्यासाठी...त्यांच्यात काम करण्यासाठी!
माणसांची साथसोबत मला कायमच हवीशी वाटत आल्ये. लहानाची मोठी झाले तीच माणसांच्या गोतावळय़ात...आईबाबांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे आणि त्यांनी नातेवाईकांशी ठेवलेल्या आपुलकीच्या संबंधांमुळे ही माणसं म्हणजे `गर्दी फुकाची' अशी भावना मनात कधीच निर्माण झाली नाही. या विविधरंगी स्वभावाच्या माणसांनीच तर जगणं समृद्ध केलं...कळत-नकळत व्यक्तिमत्त्वाला आकार दिला...तेव्हा मधूनच लागणारी एकांतवासाची ओढ त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी नक्कीच नाही, तर याच जगात नव्या दमानं परतण्यासाठी!

Tuesday, 6 September 2011

भिजपाऊस

भिजपाऊस 

      भिजपाऊस ....गेले काही दिवस हा शब्द माझ्या मनात येरझारा घालतो आहे. मातीत निजलेल्या बियांना आपल्या हळुवार स्पर्शाने  जागवणारा ....त्यांच्यातल्या सर्जनशक्तीची जाणीव करून देणारा असा हा पाऊस...! तो मुसळधार  पावसासारखा धसमुसळा नाही...आपल्याबरोबर सगळं धुऊन नेणारा नाही..तर, निसर्गाच्या हिरव्या चमत्काराला साद घालणारा ....चैतन्याला मूर्तरूप देणारा आहे. तो नसता तर....जमिनीत पहुडलेलं ते बीज, हिरवंगार रोप बनून वर आलं असतं का?...त्याच्यात दडलेली निर्मितीक्षमता त्याच्या कधी लक्षात तरी आली असती का?
          हा  भिजपाऊस  तुमच्या-माझ्या आयुष्यातही बरसत असतो ....फक्त तो आल्याचं आपल्याला कळायला हवं! त्यासाठी मनाची कवाडं कायम खुली ठेवायला हवीत ....तो बहुरूपी आहे. कधी मित्र बनून, तर कधी सहकारी बनून तर कधी एखाद्या प्रसंगाच्या रुपात आपल्या आयुष्यात येतो...अगदी काही क्षणासाठीचं त्याचं येणंही मनात निद्रिस्त असलेल्या अनेक कल्पनांना जागवतं...शब्दरूप देतं...कधी कधी विश्वास बसू नये इतकं सुंदर हातून लिहून होतं...अर्थात, लिहिणारे जरी आपण असलो तरी 'लिहविता' तो असतो....आपल्या मनाच्या अंगणात बरसून गेलेला भिजपाऊस!
         अशा अनेक सरी आतापर्यंत बरसून गेल्या...त्यातल्या काहींनी लिहितं ठेवलं....काही वेळा भिजूनही मी कोरडीच राहिले...त्यातलंच 'काही' तुमच्याबरोबर वाटून घ्यावं म्हणून इथे आले आहे....'त्याच्या'बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ब्लॉग नावही  भिजपाऊस देते आहे....कृतज्ञता व्यक्त करण्याचा मला सुचलेला हा एक मार्ग!
...अश्विनी