Wednesday, 28 September 2011

मागणं...साधं शाळेत शिकण्याची तिची इच्छाही नियतीनं कधी पूर्ण केली नाही...तरीही आयुष्यभर नवं काही शिकण्याचा  तिचा उत्साह तसूभरही उणावला नाही!
समाजाच्या उपयोगी पडावं, आपल्याकडे जे देण्यासारखं आहे ते सर्वांमधे वाटून टाकावं याची कोण आवड होती तिला...पण अंगात बळ होतं तेव्हा घराच्या व्यापातापात इतकी गुरफटलेली होती की मनात असूनही तिला समाजापर्यंत  कधी पोचताच आलं नाही.
वरवर करडया, खरं तर रागीट व्यक्तिमत्त्वाच्या तिचे हात लांबसडक आणि लोण्याहूनही मऊ होते. तिच्यातल्या कलासक्त मनाची साक्ष होती ती... तिनं जे काम केलं ते देखणं आणि लक्षवेधीच केलं. मग तो स्वयंपाकातला एखादा पदार्थ असेल किंवा भरतकामाचा नमुना किंवा स्वान्तसुखाय केलेलं लेखनही....
घराचा उंबरा ओलांडून जर तिला बाहेर पडता आलं असतं तर?....तर तिनं खूप काही केलं असतं. एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून ती नावारुपाला येण्याइतकी तिची नक्कीच क्षमता होती...
पण आयुष्याचं दानच असं पडलं की, यातलं तिला काहीच करता आलं नाही...तरी तिने नशीबाला दोष दिला नाही की स्वत:ची कहाणी लोकांना सांगून कधी सहानुभूती गोळा केली नाही...
शांत राहून संकटाशी दोन हात करण्याचं तिचं कसब अलौकिक होतं...तिच्या कुवतीप्रमाणे ती लढत राहिली.... सतत कार्यमग्न राहणं हे त्यावर तिने शोधलेलं उत्तर होतं...कधीतरी दिवस बदलतीलच हा आशावाद तिला बळ पुरवत राहिला...आणि झालंही तसंच!...दिवस पालटले...समृध्दी येताना बरोबर सुख-समाधान घेऊन आली...तिला आनंद झाला पण तोही तिच्या स्वभावाप्रमाणे तिने संयमाने व्यक्त केला....ज्या साध्या राहणीमानाचा तिने स्वीकार केला होता त्यात समृध्दीतही जराही फरक पडला नाही...अंगाला सोनं लागू दिलं नाही की जरीकाठाची साडी ल्यायली नाही...घरातल्या लेकीसुनांनी मात्र दागदागिने घालावेत, छान रहावं असं तिला वाटत असे...अर्थात्, ही इच्छाही तिने कधी कोणावर लादली नाही.
आयुष्यात अनेक अपमान वाटयाला आले. ते निमूट गिळून पुढे जाण्याचेही प्रसंग आले, पण ती कधी परिस्थितीसमोर लाचार झाली नाही. स्वाभिमानाशी तडजोड  न करता  सत्व आणि स्वत्व तिनं कायम राखलं...सर्वच मुलांची आर्थिक सुस्थिती आल्यावरही, तिने कधी चुकूनही मला पैसे हवे आहेत असं एकाही मुलाला म्हटलं नाही. त्यामागे, लागतील तेव्हा मुलं देतीलच याची जशी खात्री होती तशी तिची निर्मोही वृत्तीही याला कारणीभूत होती.
आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा तिच्या वयाच्या बायका देवधर्म-पोथ्यापुराणात मग्न असत तेव्हाही तिचा कल  वर्तमानपत्रं आणि अन्य साहित्य वाचण्याकडेच होता. 'देवाला दोन हस्तक आणि तिसरं मस्तक पुरतं ...काही लागत नाही बाकी' ही शिकवण तिच्या जगण्यातून तिनं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली.
स्त्री मुक्ती हा शब्दही माहित नव्हता तेव्हा, 'बाईनं कधी कोणाचं मिंधं असू नये, आपल्या पोटापुरतं तरी तिनं कमवायला हवं...अगदी नवऱ्याच्या तोंडाकडे पहायचीही तिच्यावर वेळ येऊ नये'असं तिचं आग्रहाचं सांगणं असे....मुलींनी वेगवेगळया क्षेत्रात केलेले  पराक्रम ऐकले की तिच्या डोळयात एक वेगळाच आनंद असे..अशावेळी शिकण्याची अतृप्त राहिलेली तिची इच्छा उसळी मारुन ओठांवर येत असे..'खरंच, कुठच्या कुठे गेली असती ही...!' त्यावेळी तिचे लुकलुकणारे डोळे समोर बसलेल्या माणसाला अस्वस्थ करत असत...
शिवाजी महाराजांचे गड-किल्ले पहायचीही इच्छा होती तिची. तिच्यात एक जिप्सी दडलेला होता. जो कायम दडूनच राहिला...नशीबानं त्याचं कोडकौतुक करायची कधी संधीच दिली नाही...हे सगळं मनात ठेवून, मात्र कशाहीबद्दल तक्रारीचा एकही शब्द न काढता काही वर्षांपूर्वी तिनं इहलोकीचा निरोप घेतला.
सारं काही सोसूनही जगण्यावर एवढं प्रेम करणारी अशी ही विलक्षण बाई आमची आजी होती. तिच्या सहवासात मोठं होण्याचं भाग्य आम्हांला लाभलं. तिला असं मागितलेलं आवडणार नाही हे ठाऊक असूनही, तिच्यासाठी फक्त एकच मागणं मागायचं आहे. तिच्या नितांतसुंदर पण अतृप्त राहिलेल्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी देवाने तिला पुन्हा जन्म द्यावा. खरं तर तो तिचं खूप देणं लागतो....त्यातलं निदान एवढं तरी त्याने फेडावंच...!
....अश्विनी

2 comments:

  1. छान झालं आहे.... एकदम हृदयस्पर्शी..... तुम्ही अनेकदा आजीबद्दल बोलला होता....ते सर्व आठवलं....

    ReplyDelete
  2. ........वाचताना पहिल्या काही ओळीतच कळून गेलं ही तर आपली आज्जी....... तिचे गुण विखरून का होईना आपल्या सर्वांमध्ये आहेतच.......... त्या रूपात ती अजुनही जिवंत आहेच.....

    ReplyDelete