Friday, 30 September 2011

बकुळफुलं....


बकुळफुलं हे आमच्या मैत्रीचं प्रतीक आहे. कितीही सुकली तरी सुगंध जिची साथ सोडत नाही आणि जिचं सौंदर्य कधी उणावत नाही अशी बकुळ...
22 वर्षं झाली तिची ओळख होऊन...एम.ए.ला आम्ही दोघी एकत्र होतो...दुपारच्या लेक्चर्सना धावतपळत, धापा टाकत ती यायची...बहुतेक वेळा अगदी लेक्चर सुरु व्हायच्या क्षणी...आणि ते संपल्यावर कर्जत गाडी पकडण्यासाठी गडबडीत निघून जायची...शिकताशिकता एकीकडे तिची नोकरीही चालू होती....बोलण्यातून हळूहळू कळत गेलं... साहित्याची तिला असलेली जाण आणि तिचं कमालीचं साधं राहणं यामुळे ओळखीच्या पलिकडे हे नातं जावं असं मला अगदी मनापासून वाटत असे...पण तो योग यायला दुसरं वर्ष उजाडावं लागलं...परिक्षेचा अभ्यास एकत्र करण्याचा प्रस्ताव तिनं समोर ठेवला...मी आनंदानं होकार दिला.
एकत्र अभ्यास करताना मला जाणवलं की, ती हाडाची शिक्षिका आहे...आणि शिकवण्याची तिची पध्दतही अनोखी, समोरच्यावर विलक्षण प्रभाव पाडणारी आहे. ती भेटेपर्यंत मलाही कविता आवडायच्या...कळायच्याही..पण कवितेच्या अंतरंगात घुसायचं म्हणजे काय हे तिच्यामुळे समजलं...कवितेचे पदर उलगडून दाखवण्याची तिची पध्दत लाजवाब होती. आणि हा गुण तिनं कमावलेला नव्हता, तिच्यात ते उपजतच होतं. तिच्यामुळे मी कवितेच्या अधिक जवळ गेले.
संवेदनशीलता हा आमच्यातला समान दुवा...एखाद्या विषयावर बोलताना एकाच वेळी दोघींच्या डोळयात पाणी तरळायचं आणि आमच्या हळवेपणाचं आम्हांलाच हसू यायचं...'कधी सुधारणार गं आपण?...आजकाल चालत नाही इतकं हळवं राहून... ' हे दोघींनाही समजत होतं पण कृतीत मात्र येत नव्हतं ..आजही त्यात फरक पडलेला नाही.
अभ्यासाच्या त्या 2 महिन्याच्या काळात कधी आम्ही एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी झालो ते कळलंही नाही...बघता बघता दुसरं वर्ष संपलं आणि आता रोजची भेट होणार नाही याची जाणीव झाली...असं दूर जाणं अटळ  आहे हे कळत असूनही ते दुखवून गेलं, अस्वस्थ करुन गेलं...हळूहळू भेटी महिन्यांनी होऊ लागल्या...कधी कधी असं व्हायचं की, आजूबाजूला असलेल्या गर्दीत दोघींचं असं बोलणं व्हायचंच नाही...खूप काही सांगायचं असायचं एकमेकींना, ते तसंच मनात ठेवून निरोपाचा क्षण समोर येऊन उभा राहायचा... 'याला काय भेट म्हणायची का गं?...नुसत्या दिसलो एकमेकींना...आता भेटू कधीतरी आजूबाजूला गर्दी नसताना.. असं एकमेकींना समजावत नाराज मनाने निरोप घ्यायचा...
मग कधीतरी खरंच दोघींना सोयीची वेळ पाहून भेटीचा दिवस ठरवायचा.. ' बाहेरच भेटू..म्हणजे निवांत आणि पोटभर बोलता येईल'..त्या भेटीचे वेध लागायचे...खूप दिवसांनी भेटतोय तर काहीतरी नेऊया भेट असं वाटून दोघीही एकमेकींसाठी भेट घेऊन जायचो...काही बोलण्याआधी हातावर गजऱ्याची पुडी ठेवली की ती म्हणायची, 'अगं, मीही तुझ्यासाठी गजरा आणला आहे...असं म्हणून तीही पुडी माझ्या हातावर ठेवायची...दोघींच्याही पुडीत बकुळीचा गजरा असायचा...या योगायोगानं हसूही यायचं आणि रडूही...तिने दिलेला गजरा मला मी आणलेल्या गजऱ्यापेक्षाही नेहमीच अधिक सुगंधी वाटायचा...मग गप्पांना सुरुवात व्हायची...आता आमची भेट वर्षांच्या अंतराने होते. मात्र, कितीही वर्षांनी भेटलो तरी काय बोलावं एकमेकींशी हा  प्रश्न कधीच पडत नाही. आता काय बोलावं असं कधी मनात येतच नाही. दोन भेटींमधलं अंतर वाढत चाललंय, पण मैत्रीत अंतर पडलेलं नाही.. मैत्रीतली उत्कटता आणि ओढ तेवढीच आणि तशीच आहे...बकुळीच्या सदासुगंधित फुलासारखी!
...अश्विनी

1 comment: