Monday, 31 October 2011

वैराग्य...विरक्ती आणि भीरक्ती


विरागी वृत्तीने जगणाऱ्यांविषयी माझ्या मनात आदरभाव असला तरी विरक्ती माझा स्थायीभाव नाही...पण कधीतरी  काही काळासाठी मी त्या 'मोड'मधे जाते खरी... हे अळवावरचं पाणी आहे हे पक्कं ठाऊक असतानाही
त्या वेळी ती भावना मनावर इतकी स्वार असते की पूछो मत...!
'वैराग्य आणि विरक्ती हे दोन समानार्थी शब्द आहेत की भिन्न अर्थच्छटेचे दोन शब्द आहेत..आणि असलाच तर त्यांच्यात नेमका फरक काय?..'या शंकेने एक दिवस मनात घर केलं आणि माझा पिच्छाच पुरवला..याचं उत्तर आपलं आपल्यालाच सापडणार नाही हे लक्षात आलं आणि मी उत्तरासाठी योग्य व्यक्ती शोधू लागले..सुदैवाने, अशा ज्ञानी व्यक्तींची भोवती कमतरता नव्हती.
प्रश्न  विचारुन जेमतेम 12 तास उलटले नसतील तर मनाचं समाधान करणारं, अर्थाच्या छटा उलगडून दाखवणारं उत्तर (तेही मला समजेल अशा भाषेत) मिळालं. या जगात जगताना सर्वसामान्य माणसाला ज्या इच्छा-आकांक्षा मोहात पाडतात त्या इच्छा-आकांक्षांचा एकदाही अनुभव न घेता त्यापासून निशचयपूर्वक दूर राहणं म्हणजे वैराग्य...आणि ज्या गोष्टींचा अनुभव पूर्वी घेतलेला आहे अशा गोष्टी आयुष्यात पुन्हा न करण्याचा निश्चय करणं म्हणजे विरक्ती.. वैराग्य हे अधिक स्थायी स्वरुपाचं असतं. म्हणजे  दोघांमधे  वैराग्याची 'यत्ता' वरची म्हणायची..(अर्थात्, सर्वसामान्यांसाठी विरक्ती हीसुध्दा अवघडच गोष्ट..)शब्दांमधला फरक समजून घेत असताना वैराग्यवृत्तीने राहणाऱ्या अनेक व्यक्ती डोळयांसमोर येऊन गेल्या.
मनातली शंका दूर झाल्याचा आनंद मिळाला..आणि आपण अर्थभेदाचा विचार न करता किती सैलपणे शब्द वापरत असतो हे लक्षात आलं.
विश्लेषणाने मनाचं समाधान झालं असलं तरी का कुणास ठाऊक दोन्ही शब्द मनात ठाण मांडून बसले..त्यांच्यातला अर्थभेद आठवून तशी माणसं शोधायचा मनाला चाळाच लागला. हे सगळं चालू असतानाच एक दिवस जेवताना माझा मुलगा मला म्हणाला, ' आई, मला दही वाढू नकोस...दह्याची मला भीरक्ती आली आहे.'
'भीरक्ती...म्हणजे रे काय?' मी कुतूहलाने विचारलं.
'भीरक्ती..म्हणजे भीतीतून आलेली विरक्ती..तुझ्याकडून परवा वैराग्य-विरक्तीबद्दल ऐकलं आणि माझ्या मनात आलं..कसल्यातरी भीतीपोटी आपण जेव्हा काही खाण्याचं टाळतो किंवा काही सवयी सोडतो तेव्हा ती भीतीतून आलेली विरक्ती असते. आता मी आवडत असूनही दही खात नाही कारण त्याच्यामुळे होणाऱ्या सर्दीची- त्या त्रासाची मला भीती आहे.' त्याने केलेला हा विचार मला एकदमच पटला..आपण बहुतेक माणसं आयुष्यभर याचाच तर अवलंब करत असतो...मनात आलं.
या भीरक्तीकडून विरक्तीकडे आणि तिथून वैराग्यापर्यंतचा प्रवास किती अवघड आहे याची जाणीव झाली. 'काहीतरी विपरीत झाल्याविशाय, शरीराला-मनाला त्रासदायक ठरल्याविशाय आपण कोणत्याही मोहाच्या पाशातून दूर जाऊ शकत नाही..किती प्रकारचे मोह आपल्या वाटेत असतात.. 'मनात विचार आला.
त्यानंतर काही दिवसांनी माणसाच्या हव्यासाबद्दल बोलणं चालू असताना माझा भाऊ मला म्हणाला,'काय माहित्ये का अश्विनी, आपण या जगात पाहुण्यासारखं राहायचं आहे हेच आपल्या लक्षात येत नाही...या अखंड जीवनप्रवाहात आपलं अस्तित्व किती क्षणांसाठी आहे हे लक्षात घेतलं तर अनेक मोहांपासून आपोआपच लांब राहू.. 'गेले काही दिवस मनात जो विचार चालू होता त्याचाच एक महत्त्वाचा दुवा त्याच्या बोलण्यातून गवसल्यासारखं वाटलं..आणि मनात प्रश्नांनी गर्दी केली...
'आपलं या जगातलं  'पाहुणेपण' लक्षात घेतलं तर खरंच आपण भीरक्तीपासून विरक्तीपर्यंत पोचू शकू?...इतरांचं सोडा, मला तरी जमेल का हे?...जे मला कळल्यासारखं वाटतंय ते कृतीत उतरवता येईल का कधी? '
-अश्विनीThursday, 20 October 2011

नवं गाव...प्रत्येक अनोळखी गावाला वास येतो कोऱ्या पुस्तकाचा...
त्याला असतो आकर्षित करणारा एक अनामिक गंध.
नव्या पुस्तकाइतकंच ते गाव असतं अनोळखी....
पुस्तक जसं पानागणिक उलगडत जातं आपल्यासमोर...
तसंच गाव कळत जातं.. गल्लीबोळातून फिरताना
हळूहळू उमजत जाते त्या गावाची संस्कृती
मनात एक ओळख नोंदवली जाते..
ज्यावर फक्त त्या गावाची मोहोर असते!
-अश्विनी


Wednesday, 19 October 2011

भूमीपुत्र1993 च्या भूकंपाच्या दु:खद खुणा अंगावर ल्यालेलं मराठवाडयातलं ते गाव...हराळी त्याचं नाव...आख्खं गाव जमीनदोस्त होतं म्हणजे काय त्याचा अनुभव घेतलेलं..मी त्या गावात पहिल्यांदा गेले तेव्हा तो भीषण भूकंप होऊन 8/9 वर्षंउलटून गेली होती..किल्लारी या भूकंपाच्या मुख्य केंद्रबिंदूपासून अवघ्या सातेक किलोमीटरवर असलेलं हे गाव.. ज्याला या आपत्तीची झळ लागली नाही असं एकही घर गावात  शिल्लक नव्हतं.  ज्याप्रमाणे विविध संस्था-संघटना विविध भूकंपग्रस्त भागांत मदतीसाठी पोहोचल्या तशा हराळीतही दाखल झाल्या. त्यातल्या बऱ्याचशा तात्कालिक (पण अर्थात्च ज्याची गरज होती अशीच) मदत करुन परतल्या. तिथे दुर्भिक्ष फक्त भौतिक सोयीसुविधेचं नव्हतं...सर्वात जास्त दुर्भिक्ष होतं ते ज्ञानाचं...शिक्षणाचं! आणि ते पिढयान्पिढयांचं होतं..ते संपावं अशी इच्छा बाळगणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके का होईना पण गावकरी त्या गावात होते हे त्या गावाचं भाग्य..त्यापैकी एक रत्नाजीदादा सूर्यवंशी. मदत देण्यासाठी दाराशी आलेल्या दात्याकडे काय मागायचं याचं शहाणपण त्यांच्यापाशी होतं..संकटातच संधी शोधणारी त्यांची ही शहाणीवच  गावाचा कायापालट करती झाली...वाईटातून चांगलं निघतं, या विधानावर श्रध्दा बसावी अशी या गावाची कहाणी!
त्यांना मदत करण्यासाठी आलेल्यांमधे पुण्याची ज्ञान प्रबोधिनीही होती. तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा, गावाची मूलभूत गरज ओळखून कायमस्वरुपी इलाज करावा, असं प्रबोधिनीला वाटत होतं. या संघटनेचं शिक्षण क्षेत्रात चांगलं काम आहे हे ठाऊक असणाऱ्या रत्नाजीदादांनी प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडे मागणी केली ती चांगल्या शाळेची.. 'आमच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन शहाणं करा..हीच मुलं उद्याचा गाव घडवतील.आणि या कामात मी पूर्णपणे तुमच्याबरोबर असेन.'अन्य काही न मागता शाळेची, चांगल्या शिक्षणाची मागणी करणारे आणि या कामात सक्रिय सहभागाचं आश्वासन देणारे रत्नाजीदादा, गावावरच्या प्रेमापोटी शहरातली नोकरी सोडून पुन्हा गावात येऊन राहिले होते. जे वचन त्यांनी प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना दिलं त्याचं आजतागायत कसोशीनं पालन करणारे रत्नाजीदादा..सुरुवातीच्या काळात आपलं घर शाळेसाठी देणारे..आजूबाजूच्या खेडयातून आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांनी आपल्या घरात आश्रय दिला. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं पोटच्या मुलांसारखी त्यांच्यावर माया केली..त्यांना न्हाऊ-माखू घातलं. आज शाळेची जागा बदलली असली तरी रत्नाजीदादा आणि त्यांच्या पत्नी पूर्णवेळ शाळेत असतात.
एकीकडे शाळेसाठी जागेचा शोध चालूच होता..शेतकऱ्यांच्या मुलांसाठी निवासी शाळा आणि प्रामुख्याने शेतीशाळा उभी करायची होती. शेतकऱ्याच्या मुलानं उच्चशिक्षित होऊन शेतीपासून दूर जाऊ नये तर विज्ञानदृष्टी असलेला प्रयोगशील शेतकरी व्हावं, हा त्यामागचा विचार..अशी शेतीशाळा उभारायची तर तशी मुबलक जागा हवी..तीही शेतजमीन हवी. ती मिळवणं हीच अवघड बाब होती..कारण ज्याला या प्रयोगाचं महत्त्व पटेल तोच जागा उपलब्ध करुन देणार..शिवाय प्रबोधिनीविषयी बरेचसे गावकरी अनभिज्ञ..त्यांच्यासाठी प्रबोधिनी ही पाहुण्यासारखीच..प्रबोधिनीला  जे काम गावकऱ्यांसाठी उभं करायचं होतं त्याचं महत्त्व लक्षात येण्याएवढं शहाणपण सगळयांकडेच नव्हतं..
पण 'चांगल्या कामाच्या मागे परमेश्वर उभा असतो' याची शब्दश: प्रचिती देणारी एक घटना घडली...परमेश्वर कस्तुरे नावाच्या गावकऱ्यानं आपली 9 एकर जमीन शाळेसाठी प्रबोधिनीला दान केली. ते काही कुणी गडगंज आसामी  नव्हेत, अगदी हातावर पोट असलेले शेतकरी...पण चांगल्या कार्यासाठी त्यांनी आपल्या वडिलोपार्जित हिश्श्यातल्या जमिनीवर तुळशीपत्र ठेवलं आणि आपलं परमेश्वर हे नाव सार्थ केलं..'मी जमीन कसली तर माझ्या कुटुंबाचं पोट भरेल, पण शाळेसाठी दिली तर पुढच्या अनेक पिढया ज्ञानसमृध्द होतील' असा विचार करणाऱ्या परमेश्वरदादांनी पुढच्या पिढयांवर अगणित उपकार केले आहेत.. त्याची वाच्यता तर लांबच पण  त्या बदल्यात कशाची अपेक्षाही केली नाही. उलट जितके दिवस जमलं तितके दिवस या कामातही सक्रिय सहभागी झाले. पुढे याच जमिनीतल्या काही भागावर शाळेची भव्य वास्तू उभी राहिली..उरलेल्या जमिनीवर शेतीतले प्रयोग सुरु झाले. आज प्रबोधिनीने 60 एकरहून अधिक शेतजमीन या प्रकल्पासाठी घेतली आहे. एरव्ही अवर्षणासाठीच  कुप्रसिध्द असलेला हा भाग, आता डोळयांचं पारणं फेडेल इतका सदाहरित झाला आहे. या यशामागे ज्ञानप्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांची प्रयोगशील दृष्टी आणि तळमळ, अहोरात्र घेतलेली मेहनत तर आहेच..त्याचबरोबर  या दोन भूमीपुत्रांनी दिलेल्या योगदानाची ताकद-पुण्याईही त्यामागे उभी आहे.
हे दोघेजण म्हणजे, 'एखाद्यानं आपल्या गावावर प्रेम कसं करावं' याचा वस्तुपाठ आहेत.
-अश्विनी
Thursday, 13 October 2011

देवदूतप्राणीप्रेमाच्या विषयात मी थेट पु.लं.ची वंशज!...मनुष्यप्राण्यांव्यतिरिक्त इतर  प्राणीमात्रांना लांबून न्याहाळायची मला सवय...श्वानप्रेमी घरांपासून तर चार हात लांब राहणारी, अशा घरात जाणं शक्यतो टाळण्याकडेच कल असणारी मी..या पार्श्वभूमीवर 5 वर्षांपूर्वी तो जेव्हा समोरच्या घरात राह्यला आला तेव्हा कपाळावर नाराजीची सूक्ष्म अठी उमटली...त्याचं ते बसक्या चेहऱ्याचं भीतीदायक रुप!...खरं तर दिसणं सोडल्यास त्याच्यात भीतीदायक काही नव्हतंच हे हळूहळू कळत गेलं... खूप लाडाकोडात वाढलेलं त्या घरातलं ते लाडकं बाळ होतं...हो, त्या घरातला तो तिसरा मुलगाच होता...आणि यात दाखवेगिरीचा भाग अजिबात नव्हता याचीही हळूहळू खात्री पटत गेली.
घराची राखण करण्यासाठी कदाचित त्याचा या घरात प्रवेश झाला असेलही पण त्याने या कुटुंबाला इतका लळा लावला की त्याच्याकडून या कामाची नंतर कधी अपेक्षाही केली गेली नाही. घरातल्या इतर माणसांसाठी ज्या सुखसोयी होत्या त्या त्या त्याच्या दिमतीला होत्या.
या नव्या घरात जिथे जिथे त्याची म्हणून बसण्याची जागा होती (तसा त्याला सगळयाच  खोल्यांमधे मुक्त प्रवेश होता तरीही..), तिथेतिथे मऊशार अंथरुण आणि छतावर खास त्याच्या सेवेत फिरणारा पंखा...उन्हाळयाच्या दिवसांत उकाडा असह्य होऊ लागला की हे साहेब त्यांच्या वडिलांच्या एअरकंडिशंड बेडरुममधे झोपायचे...(अगदी लहान असताना तर तो म्हणे कायमच त्याच्या या आईबाबांजवळ त्यांच्या बेडरुममधे झोपायचा..)तो पूर्वजन्मीचा पुण्यात्मा होता हे नक्की, कारण मुक्या प्राण्याचा जन्म मिळूनही ही  सारी सुखं त्याच्या वाटयाला आली होती. सकाळी सातच्या सुमारास त्याचं भुंकणं ऐकू यायचं...सुरूवातीच्या काळात हा आवाज ऐकला की माझी चिडचिड व्हायची..पण हे भुंकणं म्हणजे मागणं असायचं हे काही दिवसांतच लक्षात आलं..त्याची ती भुकेची वेळ असे..पोटात भुकेचा उसळलेला आगडोंब व्यक्त करायचं त्याचं माध्यम होतं ते...त्याची आईही एकीकडे त्याला चुचकारत, त्याच्याशी बोलत-त्याला शांत करत त्याच्यासाठी गरमागरम पोळया करायला ओटयाशी उभी राहायची..कधी जर तिला उशीर झाला तर याचा आवाज टिपेला पोचायचा आणि त्याचे बाबा आईवर ओरडू लागायचे..अस्वस्थ होऊन त्यांच्या येरझारा सुरु व्हायच्या.. त्याला भूक लागली आहे आणि अजून खायला दिलेलं नाही याने त्यांची चिडचिड सुरु व्हायची...एकदा का गरमागरम पोळयांचा ठरलेला कोटा त्याच्या पोटात गेला की तो कोवळं ऊन अंगावर घेत शांतपणे पडून राहायचा..खायचा तो पण, तृप्ती त्या दोघांच्या चेहऱ्यावर दिसायची. त्यांच्या अंगणात येणारा कावळा हा त्याचा शत्रू..तो कठडयाच्या टोकावर बसून कावकाव करायचा,आणि याला उचकवायचा..मग अंगणभर  हा त्याच्यामागे धावत भुंकायचा पण उंचावर बसलेल्या कावळयाला त्याचं अजिबात भय वाटायचं नाही..त्याचं काव काव आणि याचं भों..भों ही जुगलबंदी काही काळ रंगायची.
तो भुंकण्यातून  जे वेगवेगळे मेसेज द्यायचा त्याचा अर्थ  सहवासाने आणि सरावाने हळूहळू थोडाफार कळू लागला..माझी फार  प्रगती झाली नाही तरी पूर्वीचा दृष्टिकोन नक्की बदलला..त्याच्या भुंकण्याचा त्रास होईनासा  झाला आणि भीती कमी झाली. घरातल्या आई-बाबांशी त्याच्या भाषेत चाललेली लाडीगोडी कळायला लागली , त्यात गंमतही वाटू लागली..घरातलं लाडावलेलं लहान मूल जसं मोठयांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करुन आपले उद्योग चालूच ठेवतं तसंच त्याचं होतं..त्यांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करण्यात तो तरबेज होता..पण घरातला तरुण मुलगा किंवा सून जर त्याला ओरडली तर लगेच गप्प बसायचं शहाणपणही त्याच्याकडे होतं..आपली डाळ कुठे शिजते याची त्याला असलेली जाण थक्क करणारी होती.
एकदा घरातले आई-बाबा 8/10 दिवसांसाठी बाहेरगावी जायचे होते..फिरायला जायची तयारी सुरु असताना एकीकडे त्याला सांगणंही चालू होतं,..'हे बघ, मी आणि बाबा फिरायला जाणार आहोत...दादाला, वहिनीला त्रास नाही द्यायचा..शहाण्यासारखं वागायचं..' त्याच्या अंगावर हळुवार थोपटत त्याची आई त्याला सांगत होती..आपण त्याचं वेळापत्रक पाळतो तसं पाळलं जाणार नाही, थोडं मागेपुढे होईल तेव्हा याने भुंकून घर डोक्यावर घ्यायला नको असं तिला वाटत असावं..सगळयात जास्त तो तिच्याच जवळ असायचा, त्यामुळे तिचा लळा अधिक..मुलांनी हौसेसाठी घरात आणलेलं ते पिल्लू खरं तर तिचंच झालं होतं..आपल्या बाळाचं करावं इतक्या प्रेमाने त्याचं करताना ती त्याची आई होऊन गेली होती..टिपिकल आईची काळजी तेव्हा तिच्या बोलण्यातूनही डोकावत होती.
आपले लाड करणारे आई-बाबा घरात नाहीत हे त्याला कळलं आणि सकाळची भुकेची वेळ टळून गेल्यावर भुंकून गोंधळ घालणारा-आईला भंडावून सोडणारा तो, गरमागरम पोळयांची वाट पाहत खिडकीशी शांतपणे बसून राहायला लागला..एक दिवस सकाळी मी आमच्या बागेत पाणी घालत होते, तो खिडकीशी पोळयांची वाट पाहत शांतपणे बसून होता..मी त्याला हाक मारली, 'काय रे..कुठे गेले आई-बाबा..आईची आठवण येत्ये तुला..?' मी विचारलं, तसा तो वळून माझ्याकडे तोंड करुन बसला..तो नेहमीच्या भुंकण्यापेक्षा वेगळाच आवाज काढत मला काही सांगू पाहात होता..आई-बाबांचं इतके दिवस दूर राहाणं बहुतेक त्याला सहन होत नसावं..त्यांची आठवण त्याला अस्वस्थ करत असावी..बिनशब्दाचं त्याचं बोलणं पोचत होतं माझ्यापर्यंत ..त्याच्या डोळयातले भाव मला वाचता येत होते..नकळत डोळे भरुन आले. इतक्या दिवसांत प्रथमच आम्ही दोघं एकमेकांशी बोलत होतो..पण तो संवाद मनात कायमचा कोरला गेला..कधी नव्हे तो त्याच्या पाठीवरुन हात फिरवावा, त्याला थोपटावं अशी इच्छा झाली..घाबरतच, पण मी त्याला हलकेच थोपटलं..'येणार हां आता आई..' त्याला समजावलं. 2/3 दिवसांतच त्याचे आई-बाबा आले..ते आल्याचं याच्यामुळेच कळलं..कारण आनंदाने बेभान होऊन तो ओरडत होता..त्यांच्या अंगावर उडया मारत होता..घरातल्या कोणाशीही त्यांनी बोलू नये, फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं असा त्याचा हट्ट होता. शेवटी तो जिंकला..आईने त्याला मायेनं कुरवाळलं, थोपटलं..त्याची विचारपूस केली, तेव्हा त्याचं समाधान झालं..मग तो शहाण्या बाळासारखा आपल्या अंथरुणावर जाऊन झोपला. हे सगळं दृश्य विलक्षण होतं.
एकदा तो खूप अस्वस्थ होऊन घरातल्या अंगणात फेऱ्या घालत होता..मधेच हॉलच्या दरवाजाशी जाऊन भुंकून, मला आत घ्या असं सांगत होता...तो विनवत नव्हता, तर त्याच्या आवाजात जरब होती..एक प्रकारचा अधीरेपणाही होता..नेहमीपेक्षा थोडं वेगळं वाटलं म्हणून मी हाक मारुन त्याला काय झालं असं विचारलं..तेव्हा हसत-हसत उत्तर मिळालं, 'अगं, आज त्याची मैत्रीण आल्ये ना..म्हणून उतावळा झालाय. त्यांचं मेटिंग आहे'..हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नव्हता..मग कळलं, वर्षातून दोन वेळा तरी अशी भेट घडवावी लागते...(आज त्याची डझनाहून अधिक मुलं वेगवेगळया घरात नांदताहेत.)
काही दिवसांनी त्यांच्या घरात तान्हं बाळ आलं..त्या बाळाशी खेळावं, त्याचे लाड करावेत असं त्याला वाटू लागलं...बाळ दिवाणखान्यात आलं की त्याला त्याच्या जवळ जायचं असे..तेव्हा आपल्या गळयातली साखळी कोणीतरी काढावी यासाठी तो भुंके..पण इतकी रिस्क घ्यायची घरातल्यांची काही हिम्मत होत नसे. गंमत अशी त्याच्या आवाजाने ते बाळ मात्र रडायचं नाही की त्याला घाबरायचंही नाही.. आजी -आजोबा बाळाला अंगणात घेऊन गेले की याच्या जिवाची घालमेल सुरु होई..आपल्याला न घेता गेलेच कसे याचा राग त्याच्या आवाजातून व्यक्त होई..ते बाळ म्हणजे त्याच्या प्रेमातलं भागीदार झालं होतं..अर्थात्, त्याला त्याची हरकत नव्हती फक्त आपल्यालाही बरोबर घ्यावं इतकीच अपेक्षा असे..
बाळ वर्षाचं होईपर्यंत त्या दोघांमधे छान टयूनिंग झालं..बाळाला त्याची अजिबात भीती वाटत नाही याचा सगळयांना आनंदही झाला.आता काही दिवसांनी त्यांना एकत्र खेळता येईल, असं घरातले म्हणू लागले..आणि अगदी अचानक, एका दिवसाच्या  आजाराचं निमित्त होऊन तो हे जग सोडून गेला..हार्ट फेल झालं म्हणे.. तसं त्याचं वय झालं होतं असंही कळलं..हे वास्तव असलं तरी ते स्वीकारणं त्या कुटुंबासाठी खूपच अवघड होतं..बाबा तर खूप दिवस त्याच्या आठवणीत बुडून गेले होते. आम्हांलाही त्याचं नसणं स्वीकारणं जडच गेलं.
आता त्यांच्या दिवाणखान्यात त्याचा भलामोठा फोटो आहे...आणि त्याच्या नावापुढे कुटुंबाचं आडनावही लिहिलं आहे..पुढे लिहिलं आहे, 'आमच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी पृथ्वीवर आलेला तू देवदूत होतास..' तो असेलही देवदूत..पण त्याच्यासाठी देवाने घराची केलेली निवड मात्र अचूक होती..हे नक्की..मी त्याची एक साक्षीदार आहे.
-अश्विनी