Wednesday, 19 October 2011

भूमीपुत्र1993 च्या भूकंपाच्या दु:खद खुणा अंगावर ल्यालेलं मराठवाडयातलं ते गाव...हराळी त्याचं नाव...आख्खं गाव जमीनदोस्त होतं म्हणजे काय त्याचा अनुभव घेतलेलं..मी त्या गावात पहिल्यांदा गेले तेव्हा तो भीषण भूकंप होऊन 8/9 वर्षंउलटून गेली होती..किल्लारी या भूकंपाच्या मुख्य केंद्रबिंदूपासून अवघ्या सातेक किलोमीटरवर असलेलं हे गाव.. ज्याला या आपत्तीची झळ लागली नाही असं एकही घर गावात  शिल्लक नव्हतं.  ज्याप्रमाणे विविध संस्था-संघटना विविध भूकंपग्रस्त भागांत मदतीसाठी पोहोचल्या तशा हराळीतही दाखल झाल्या. त्यातल्या बऱ्याचशा तात्कालिक (पण अर्थात्च ज्याची गरज होती अशीच) मदत करुन परतल्या. तिथे दुर्भिक्ष फक्त भौतिक सोयीसुविधेचं नव्हतं...सर्वात जास्त दुर्भिक्ष होतं ते ज्ञानाचं...शिक्षणाचं! आणि ते पिढयान्पिढयांचं होतं..ते संपावं अशी इच्छा बाळगणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके का होईना पण गावकरी त्या गावात होते हे त्या गावाचं भाग्य..त्यापैकी एक रत्नाजीदादा सूर्यवंशी. मदत देण्यासाठी दाराशी आलेल्या दात्याकडे काय मागायचं याचं शहाणपण त्यांच्यापाशी होतं..संकटातच संधी शोधणारी त्यांची ही शहाणीवच  गावाचा कायापालट करती झाली...वाईटातून चांगलं निघतं, या विधानावर श्रध्दा बसावी अशी या गावाची कहाणी!
त्यांना मदत करण्यासाठी आलेल्यांमधे पुण्याची ज्ञान प्रबोधिनीही होती. तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा, गावाची मूलभूत गरज ओळखून कायमस्वरुपी इलाज करावा, असं प्रबोधिनीला वाटत होतं. या संघटनेचं शिक्षण क्षेत्रात चांगलं काम आहे हे ठाऊक असणाऱ्या रत्नाजीदादांनी प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडे मागणी केली ती चांगल्या शाळेची.. 'आमच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन शहाणं करा..हीच मुलं उद्याचा गाव घडवतील.आणि या कामात मी पूर्णपणे तुमच्याबरोबर असेन.'अन्य काही न मागता शाळेची, चांगल्या शिक्षणाची मागणी करणारे आणि या कामात सक्रिय सहभागाचं आश्वासन देणारे रत्नाजीदादा, गावावरच्या प्रेमापोटी शहरातली नोकरी सोडून पुन्हा गावात येऊन राहिले होते. जे वचन त्यांनी प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना दिलं त्याचं आजतागायत कसोशीनं पालन करणारे रत्नाजीदादा..सुरुवातीच्या काळात आपलं घर शाळेसाठी देणारे..आजूबाजूच्या खेडयातून आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांनी आपल्या घरात आश्रय दिला. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं पोटच्या मुलांसारखी त्यांच्यावर माया केली..त्यांना न्हाऊ-माखू घातलं. आज शाळेची जागा बदलली असली तरी रत्नाजीदादा आणि त्यांच्या पत्नी पूर्णवेळ शाळेत असतात.
एकीकडे शाळेसाठी जागेचा शोध चालूच होता..शेतकऱ्यांच्या मुलांसाठी निवासी शाळा आणि प्रामुख्याने शेतीशाळा उभी करायची होती. शेतकऱ्याच्या मुलानं उच्चशिक्षित होऊन शेतीपासून दूर जाऊ नये तर विज्ञानदृष्टी असलेला प्रयोगशील शेतकरी व्हावं, हा त्यामागचा विचार..अशी शेतीशाळा उभारायची तर तशी मुबलक जागा हवी..तीही शेतजमीन हवी. ती मिळवणं हीच अवघड बाब होती..कारण ज्याला या प्रयोगाचं महत्त्व पटेल तोच जागा उपलब्ध करुन देणार..शिवाय प्रबोधिनीविषयी बरेचसे गावकरी अनभिज्ञ..त्यांच्यासाठी प्रबोधिनी ही पाहुण्यासारखीच..प्रबोधिनीला  जे काम गावकऱ्यांसाठी उभं करायचं होतं त्याचं महत्त्व लक्षात येण्याएवढं शहाणपण सगळयांकडेच नव्हतं..
पण 'चांगल्या कामाच्या मागे परमेश्वर उभा असतो' याची शब्दश: प्रचिती देणारी एक घटना घडली...परमेश्वर कस्तुरे नावाच्या गावकऱ्यानं आपली 9 एकर जमीन शाळेसाठी प्रबोधिनीला दान केली. ते काही कुणी गडगंज आसामी  नव्हेत, अगदी हातावर पोट असलेले शेतकरी...पण चांगल्या कार्यासाठी त्यांनी आपल्या वडिलोपार्जित हिश्श्यातल्या जमिनीवर तुळशीपत्र ठेवलं आणि आपलं परमेश्वर हे नाव सार्थ केलं..'मी जमीन कसली तर माझ्या कुटुंबाचं पोट भरेल, पण शाळेसाठी दिली तर पुढच्या अनेक पिढया ज्ञानसमृध्द होतील' असा विचार करणाऱ्या परमेश्वरदादांनी पुढच्या पिढयांवर अगणित उपकार केले आहेत.. त्याची वाच्यता तर लांबच पण  त्या बदल्यात कशाची अपेक्षाही केली नाही. उलट जितके दिवस जमलं तितके दिवस या कामातही सक्रिय सहभागी झाले. पुढे याच जमिनीतल्या काही भागावर शाळेची भव्य वास्तू उभी राहिली..उरलेल्या जमिनीवर शेतीतले प्रयोग सुरु झाले. आज प्रबोधिनीने 60 एकरहून अधिक शेतजमीन या प्रकल्पासाठी घेतली आहे. एरव्ही अवर्षणासाठीच  कुप्रसिध्द असलेला हा भाग, आता डोळयांचं पारणं फेडेल इतका सदाहरित झाला आहे. या यशामागे ज्ञानप्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांची प्रयोगशील दृष्टी आणि तळमळ, अहोरात्र घेतलेली मेहनत तर आहेच..त्याचबरोबर  या दोन भूमीपुत्रांनी दिलेल्या योगदानाची ताकद-पुण्याईही त्यामागे उभी आहे.
हे दोघेजण म्हणजे, 'एखाद्यानं आपल्या गावावर प्रेम कसं करावं' याचा वस्तुपाठ आहेत.
-अश्विनी
No comments:

Post a Comment