Tuesday, 22 November 2011

निरागसांची सुंदर दुनिया...'मं..मं..झायी? ' ...दीड वर्षाची तनु, मान वाकडी करुन हातावर बसलेल्या डासाला अतिशय प्रेमाने विचारत होती... मोठं कोणीतरी मिश्किलपणे म्हणालं, 'अगं वेडे..तुझ्या हातावर बसून त्याची मंमंच करतोय तो..आजूबाजूचे मोठे या उद्गारावर खो..खो हसले..तनुच्या ते गावीही नव्हतं, ती डासाशी गप्पा मारण्यात-त्याची विचारपूस करण्यात दंग झाली होती.. 'मं..मं झायी? आणि 'जो..जो झायी? या दोन प्रश्नार्थक वाक्यांची तिच्या शब्दसंग्रहात नव्यानेच भर पडली होती..त्यामुळे समोर जो कोणी येईल त्याला हे विचारण्याचा नवा छंद तिला जडला होता..मग तो अंगणात येणारा काऊ असो की चिऊ असो की तिच्या गोऱ्यापान हातावर बसून तिचं रक्त शोषणारा डास असो..या संवादाने सगळया मोठयांची छान करमणूक होत होती आणि मोठयांच्या दुनियेतून कधीच हद्दपार झालेल्या निरागसतेचं हे दर्शन सुखावणारंही  होतं..
असे 'बोल ऐकले की मोठं होण्याच्या बदल्यात आपण काय गमावलंय हे लक्षात येतं ... मोठं होण्याच्या  या अटळ प्रवासात कधी बोट सोडून जाते ही निरागसता आणि भाबडं मन?..
किती वेगळी आणि सुंदर असते लहानग्यांची दुनिया..निष्पाप, भाबडी आणि निरागस..जगण्यात आणि वागण्यात कोणतेही  छक्केपंजे नसलेली ती सुरूवातीची 3/4वर्षं..आप-पर भावाचा, संकोचाचा आणि भीतीचा स्पर्शही नसलेली...सर्वांशी  सहजी  'संवाद'  साधणारं ते वय..त्यांचं  जग  केवळ भवतालच्या माणसांचं  नसतं  तर त्यात सर्व सजीव सामावलेले असतात. म्हणूनच आई भरवत असलेल्या भाताचा घास, पायाशी शेपूट हलवत बसलेल्या भू-भू लाही भरवायचा आग्रह केला जातो.  केवळ आग्रहच नाही तर आपल्या चिमुकल्या हातांनी घास भरवलाही जातो.
आकाशीचा चांदोमामा हा तर छोटयांचा सगळयात जवळचा दोस्त...त्याला पाहून आनंदाने लकाकणारे ते चिमणे डोळे..टाळया वाजवत, बोबडया आवाजात म्हटलं जाणारं चांदोमामाचं गाणं...त्या दिवशी तर गंमतच झाली, चांदोमामाला गाणं म्हणून दाखवल्यावर आजीनं तनुला म्हटलं, 'पुरे किती वेळ थांबायचं अंगणात..चल आता आत... नेहमीप्रमाणेच बराच वेळ बाहेर बागडूनही, पोट न भरलेल्या तिने नाराजीने घराच्या दिशेने मोर्चा वळवला..पण जाता जाता तिला काय वाटलं कोणास ठाऊक...आकाशाच्या दिशेने चांदोमामाकडे पहात तिने हात हलवला..त्याला बाय केलं आणि 'गुड नाईट म्हणत फ्लाईंग कीसही दिला..हसऱ्या डोळयांनी त्याचा निरोप घेत ती वळली..तिचा निरोपाचा पापा पोचला असावा बहुतेक, कारण माझं लक्ष अभावितपणे वर गेलं तेव्हा तोपर्यंत तिथेच थबकलेला चांदोमामा तिच्या घरावरुन पुढे सरकला होता..
ओंजळीत धरुन ठेवाव्याशा वाटणाऱ्या एक नितांतसुंदर, लोभस  क्षणाची मी साक्षीदार होते...मला हेवा वाटला, तिच्या निरागस प्रेमाचा आणि त्या भाग्यवंत चांदोमामाचाही...!
-अश्विनी