Tuesday, 31 January 2012

यशोदारात्रीचा आठचा सुमार असेल..तिच्या सोसायटीच्या प्रवेशद्वारातच वातावरणातली स्तब्धता जाणवली. त्या शांततेने अंगावर काटा आला. उसनं बळ गोळा करून तिच्या 'दर्शना'साठी आलेली मी क्षणभर तिथेच थबकले...स्वत:ला सावरलं आणि जड पावलांनी तिच्या दिवाणखान्यात पाऊल टाकलं.
..तिचा निष्प्राण देह एका सतरंजीवर विसावला होता. अंगावर गळापर्यंत चादर घातलेली. चेहरा तेवढा उघडा, निमूट सोसलेल्या वेदनांची साक्ष देणारा!...कपाळावर नेहमीसारखंच ठसठशीत कुंकू आणि कुरळया केसांमधे वेणी माळलेली...
समोरच्या कोचावरच तिचा नवरा बसलेला. खिन्न मनाने, उदास चेहऱ्याने तिच्याकडे एकटक पाहत.. संसार जेमतेम अर्ध्यावर आलेला असताना तिचं असं निघून जाणं...अशा वेळी तिच्या जिवलगांचं सांत्वन तरी कोणत्या शब्दांत करायचं?..त्याच्यासमोर उभं राहणं अवघड वाटायला लागलं तशी मी आतल्या खोलीत वळले. मला पाहून तिच्या लग्न झालेल्या मुलीने आणि धाकटया मुलाने हंबरडाच फोडला..कुशीत शिरलेल्या तिच्या मुलीला शांत करत उभी राहिले. डोळयासमोर गेल्या दहा वर्षांतल्या तिच्या आठवणींनी फेर धरला होता.
...आमचं नवं घर तयार होत असताना या इमारतीत वर्षभरासाठी आम्ही भाडयाने ब्लॉक घेतला होता. त्यावेळी माझा धाकटा मुलगा नुकताच वर्षाचा झाला होता आणि त्याच्या संगोपनासाठी वर्षभर घरात थांबलेली मी पुन्हा बाहेर पडायचा विचार करत होते. मात्र त्यात एक अडचण होती, ती म्हणजे माझ्या सतत अवतीभवती असण्याने माझा लेक पुरता आईवेडा झाला होता. तेव्हा याला सोडून कसं बाहेर पडायचं हा विचार मला अस्वस्थ करत होता. या ब्लॉकमधे माझं सामान लावून होईपर्यंत माझ्या आईने माहिती मिळवली की, वरच्या ब्लॉकमधे राहणाऱ्या बाईंनी नुकतंच पाळणाघर सुरू केलंय. आईच्या स्वभावानुसार ती त्यांच्याशी गप्पा मारुन आणि पाळणाघराचं नक्की करुनही आली..इतक्या लगेच प्रश्न सुटल्याने मला खूप बरं वाटलं, मात्र तोवर आम्ही एकमेकींना पाहिलंही नव्हतं.
सगळं सामान लागायला संध्याकाळ झाली आणि त्यानंतर मी तिला भेटायला गेले. 'तीन मोठया मुलांची आई म्हणजे असेल पन्नाशीकडे झुकलेली बाई' असा विचार करत मी तिच्या दाराची बेल वाजवली. मात्र दार उघडणाऱ्या बाईकडे बघून पार गोंधळून गेले. जेमतेम चौतीस-पस्तिशीची, नाजूक चणीची ही बाई एवढया मोठया मुलांची आई असेल यावर माझा विश्वासच बसेना. कुरळया केसांचा इवलासा अंबाडा, त्यावर माळलेला नाजूकसा गजरा, लक्ष वेधून घेणारं कपाळावरचं ठसठशीत कुंकू आणि तिच्या शिस्तप्रिय स्वभावाची साक्ष असलेला करडा चेहरा...वागणं, बोलणंही करडेपणाकडेच झुकणारं आहे, हे थोडयाशा संभाषणातूनही जाणवलं. 'मुलाचं करेल ना प्रेमाने' हे प्रश्नचिन्ह मनात घेऊनच मी जिना उतरले आणि थोडया साशंक मनाने दुसऱ्या दिवसापासून धाकटयाला तिच्याकडे ठेवायला सुरुवात केली.
...आणि काय आश्चर्य! माझी सावली वळेल त्या दिशेला वळणारा माझा लेक अगदी पहिल्या दिवसापासूनच तिच्याकडे रमला. मला अगदी मनोमन आनंद झाला. आपण लहान मुलाला सोडून जातोय हा अपराधी भावही कमी झाला. वरुन ती करडया शिस्तीची वाटली तरी मुलांचं नक्की प्रेमाने करत असणार याची खात्री पटली.
आणखी काहीच दिवसांत त्या घरातल्या इतरांशीही ओळखी होत गेल्या. तीन मुलं आणि नवरा-बायको असं त्यांचं पाच जणांचं कुटुंब. तिच्या मुलीला पहिल्यांदा पाहिली तेव्हा 16 वर्षांची ती उंचनिंच, आडव्या बांध्याची मुलगी बघून मला धक्काच बसला. दोघींच्यात अजिबातच साम्य नव्हतं. माझ्या चेहऱ्यावर उमटलेलं प्रश्नचिन्ह तिनं वाचलं. म्हणाली, 'धक्का बसला ना हिला बघून? अगदी वडलांवर गेल्ये ती...आणि हिचा जन्म झाला तेव्हा मी जेमतेम सोळा-सतरा वर्षांची होते...म्हणूनही माझी मुलगी वाटत नाही.' तिच्या उत्तराने माझं समाधान झालं आणि तिच्या नवऱ्याला पाहिल्यावर तर मुलगी अगदी वडिलांची कार्बन कॉपी आहे हेही लक्षात आलं.
आम्ही शेजारणीही असल्याने आमच्यात लवकरच स्नेहाचं नातं निर्माण झालं. लेकाला आणायला गेल्यावर पाणी पिण्याच्या निमित्ताने तिथे रेंगाळणं होऊ लागलं. 'बाहेरुन परस्पर येताय ना...चहा ठेवते पटकन' असा तिचा अधूनमधून आग्रह होऊ लागला. साहजिकच गप्पाही होऊ लागल्या. माझ्यासाठी ती 'शेजारीण' होती पण, ती माझ्यात 'मैत्रीण' शोधत होती हे हळूहळू लक्षात येऊ लागलं. आपला संसार आणि त्याला हातभार म्हणून सुरू केलेलं पाळणाघर यापलिकडे तिचं विश्व नव्हतं. त्यामुळे माझ्याशी होणाऱ्या गप्पांची ती आतुरतेने वाट पाहत असे. मीही मग अगदी जाणीवपूर्वक वेळ घेऊन तिच्याकडे गप्पा मारायला जाऊ लागले. अतिशय विश्वासाने तिने केलेल्या हितगुजातून तिचा पूर्वेतिहास समजायला लागला.
श्रीमंत, सुखवस्तू घरातली ही लेक...मुंबईच्या उपनगरात वडिलांच्या 4/5 चाळी होत्या. कशाला म्हणून ददात नव्हती. दोन मुलगे आणि मुलगी ही एकटीच. त्यामुळे लाडात वाढली. ती तेरा-चौदाच्या उंबरठयावर असताना अचानक वडील वारले आणि घराचे वासे फिरले. वास्तविक येणाऱ्या नुसत्या भाडयावरही घराचा उदरनिर्वाह झाला असता, पण भावाची बुध्दी फिरली. सगळया प्रकारची व्यसनं त्यानं जवळ केली आणि घराची वाताहत झाली. मोठा भाऊ व्यसनी आणि धाकटा मतिमंद...तेव्हा आपल्यामागे या मुलीला कोण विचारेल या काळजीने आईने सोळाव्या वर्षीच तिचं लग्न लावून दिलं. घरातल्या ओढगस्तीची पर्वा न करता, लेकीचं सालंकृत कन्यादान केलं.
सासरी हिचा नवरा भावंडांमधे मधला...पण मोठया भावंडांनी कर्तेपण नाकारल्यावर कुटुंबाची जबाबदारी त्याच्याच शिरावर येऊन पडलेली. त्यात शिक्षण बेताचं असल्याने मिळकतही बेताची. टुकीनं संसार करण्यावाचून तिच्यासमोर काही पर्यायही नव्हता. मात्र नवऱ्यावर जीव जडल्याने, तिनं हौसमौजेची सगळी स्वप्नं मनात बंद करुन जो पदर खोचला तो अखेरच्या श्वासापर्यंत...! एका शब्दानेही त्याबद्दल नाराजी व्यक्त न करता!
तिनं समजूतदारपणा दाखवला तरी नवऱ्याच्या मनात बोच होती...श्रीमंताघरात वाढलेल्या बायकोला आपण सुखात ठेवू शकलो नाही असं त्याला नेहमी वाटत असे. म्हणूनच घरच्या जबाबदाऱ्यांतून मोकळं झाल्यावर त्याने कर्ज काढून ब्लॉक घेतला. इतकी वर्षं तक्रार न करता छोटयाशा जागेत मनापासून संसार करणारी ती सुखावली. तिची मूळची कलासक्त वृत्ती उफाळून आली. अतिशय साधं पण तिच्या सौंदर्यदृष्टीची झलक दाखवणारं घर येणाऱ्या प्रत्येकाचं मन प्रफुल्लित करत असे. घरातल्या कोणत्याही कामाला बाई नाही आणि शिवाय पाळणाघर चालवणं असं असतानाही घर टापटीप ठेवण्याबाबत ती दक्ष असे. सगळं कसं जागच्याजागी, नुकतंच ठेवल्यासारखं! पाळणाघरातल्या मुलांचं करतानाही स्वच्छतेकडे कटाक्ष. लहान मुलांचे शी-शूचे कपडे डेटॉलमधे धुणं, त्यांनी जमिनीवर पडलेलं काही तोंडात घालू नये म्हणून सर्व खोल्या दिवसातून दोन वेळा डेटॉलने पुसणं...इतकी पराकोटीची काळजी आणि त्यांना वेळच्यावेळी भरवणंही तितक्याच मायेने. म्हणूनच पाळणाघरातली सर्व मुलं तिला 'आई'च म्हणत असत. 'तुम्ही तर यशोदा आहात हो!' मी एकदा कौतुकाने म्हटलं, तेवढया प्रशंसेनेही ती सुखावली.' असं कोणी कौतुक केलं ना म्हणजे कष्टाचं चीज होतं हो!' ती मनापासून म्हणाली. खरं तर, ते तिच्यासाठी पाळणाघर नव्हतंच...तिचं विस्तारलेलं कुटुंबच होतं...
आमच्या घराचं बांधकाम पूर्ण झालं आणि आमचा त्या इमारतीतून मुक्काम हलला. साहजिकच पाळणाघर बंद झालं. आम्हांला दोघींनाही वाईट वाटलं. पण इलाज नव्हता. रोज होणाऱ्या भेटी संपल्या. महिन्या-दोन महिन्यांनी भेट होऊ लागली.
त्यानंतर काही दिवसांनीच तिच्या मुलीनं पळून जाऊन आंतरजातीय विवाह केल्याची बातमी कानावर आली. त्याची कुणकूण आधी होतीच. मी मुलीला हटकलंही होतं त्यावरुन. पण आईच्या कडक शिस्तीपायी ती बोलण्याची हिम्मत करु शकत नव्हती. मलाही आईशी बोलायची बंदी केली तिनं. आणि शेवटी तिच्या लग्नाची बातमी ऐकावी लागली. ती कळल्यावर तिला भेटणं भागच होतं. हिम्मत करुन तिच्यासमोर जाऊन बसले. पण सर्व राग-दु:ख गिळून ती वेगळयाच विषयावर माझ्याशी गप्पा मारायला लागली. तिला माझी सहानुभूती नको होती, पण मला तो विषय बोलल्याशिवाय स्वस्थ बसवेना. म्हणून मी अतिशय समजावणीच्या सुरात म्हटलं, 'झालं गेलं विसरुन जा...आणि लेकीला जवळ घ्या. आज सगळयात जास्त तिला तुमच्या कुशीची गरज आहे.' माझ्या या उद्गारासरशी तिनं तोवर दाबून ठेवलेला राग उफाळून वर आला. म्हणाली, 'काही गरज नाही हो माझ्या कुशीची...माझ्या पोटचा गोळा नव्हताच तो...मग कशाला सांगेल मला ती?' तिच्या या अनपेक्षित बोलण्याने मी चमकलेच. रागाच्या भरात आहे असं म्हणून दुर्लक्ष केलं. काही वर्षांनी तिचा राग निवळला आणि तिच्या घराचे दरवाजे लेक-जावयासाठी खुले झाले. लेकीचं मनापासून माहेरपण करु लागली आणि तिच्या त्या उद्गारांचं माझ्या मनावरचं सावट दूर झालं. काही वर्षं तणावात असलेल्या तिच्या घरालाही आनंदाचं वारं लागलं.
मात्र तिचं हे सुख नियतीला पाहवलं नाही...त्यानंतर दोनच वर्षांत तिला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचं लक्षात आलं. घराचं स्वास्थ्य आणि धन दोन्ही हिरावून घेणारा हा आजार. आपल्या आजारावर नवऱ्याने कष्टाने जमवलेली मिळकत वाया जायला नको या गैरसमजुतीने तिने उपचार करुन घेणं नाकारलं. नवऱ्याला मात्र जमवलेल्या पुंजीपेक्षा तिचं बरोबर असणं महत्त्वाचं वाटत होतं. तो तर कर्जही काढायला तयार होता. पण तिच्या हटवादीपणापुढे त्याचं काही चाललं नाही. तो हताश होऊन, रोज कणाकणाने तिचं संपणं पाहत राहिला. माझ्या हे कानावर आलं तेव्हा तिला समजवण्यासाठी घरी गेले. पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती. तिची मूळची नाजूक कुडी खंगत चाललेली पाहून माझं काळीज हललं. आता हिच्याविषयी कोणत्याही क्षणी वाईट ऐकावं लागेल, हे माझ्या लक्षात आलं.
आणि काही महिन्यांनीच तो क्षण आला...तिच्या निष्प्राण कलेवराची भेट घेण्याचा. 'शेवटी आपलं खरं केलं तिनं..'मनात पहिला प्रतिक्रिया उमटली. घरातले सगळेच सुन्न बसले होते. मुलीचा आक्रोश तर थांबता थांबत नव्हता. तिला नेण्याची वेळ जवळ आली तशी ती एकदम म्हणाली, 'कोणी गजरे आणता का मोगऱ्याचे? ती कायम माळायची...आज जातानाही तो तिच्या सोबत असूदे'...सगळेच हेलावले. तेवढया रात्री कुणीतरी जाऊन गजरे आणले आणि मुलीच्या हातात ठेवले. मुलीने थरथरत्या हाताने ते आईच्या केसात माळले. तिला आईपासून दूर करताना सर्वांनाच खूप अवघड गेलं.
...या प्रसंगानंतर दोन-चारच दिवसांनी तिच्या पाळणाघरात येणाऱ्या एका मुलीची आई रस्त्यात भेटली. बोलण्यात तिचा विषय निघणं स्वाभाविक होतं, तसा तो निघालाही. मात्र बोलता बोलता अचानक ती बाई म्हणाली, 'आणि तुम्हांला माहित्ये का..ती त्यांची सख्खी मुलगी नव्हतीच. धाकटे दोघे मुलगे फक्त त्यांचे. त्यांच्या मिस्टरांच्या पहिल्या बायकोची ती मुलगी. पहिली बायको गेल्यावर त्यांनी हे दुसरं लग्न केलं...' पुढचं काही मला ऐकूच आलं नाही...'लेकीच्या लग्नानंतर तिने काढलेले उद्गार म्हणजे रागाचा उद्रेक नव्हता तर...! मग माझ्यापाशी इतकं मन मोकळं करताना तिने हे कधीच का सांगितलं नाही?' पाळणाघरातल्या मुलांच्या संदर्भात मी जेव्हा तिला 'यशोदा' म्हटलं होतं तेव्हा फुललेला तिचा चेहरा आठवला...पण वास्तव आयुष्यातही ती यशोदाच होती ते त्या दिवशी समजलं..आणि नकळत हात जोडले गेले, माझ्या यशोदेसाठी!
...अश्विनी 


Saturday, 21 January 2012

प्रिय सई.....

प्रिय सईबाई,
खरं तर काही दिवसांपूर्वीचीच आपली ओळख! आमच्या आवारातल्या, माझ्या लाडक्या सोनचाफ्यावर तुझं येणं वाढू लागलं तेव्हापासूनची...सकाळच्या कामाच्या लगबगीतही, एक दिवस तुझ्या कर्णमधुर  'टीटीव...टीटीव'नं माझं लक्ष वेधून घेतलं..खिडकीसमोरच्या माझ्या चाफ्यावर बसून, तू कसलीशी टेहळणी करत असावीस...चिऊताईपेक्षाही नाजूक चणीची, अगदी मुठीतही सहज मावशील इतकी इवलुशी ...आपल्या चिमुकल्या चोचीतून तू एकसारखं काहीतरी आणत होतीस ...कधी गवताची लहानशी काडी तर कधी चिमूटभर  कापूस ...
आठवड्यानंतर माझ्या लक्षात आलं की, जेमतेम १५-२० पानं असलेल्या माझ्या त्या 'बाळ'चाफ्यावर तू सुरेख घरट केलं आहेस...चाफ्याची अगदी खालच्या अंगाला असलेली २ पानं, तू टाके घालून इतकी सुरेख शिवली होतीस की तुझं 'शिंपी' नामकरण सार्थ ठरावं!...दोन पानांनी तयार झालेल्या त्या बंदिस्त चिंचोळ्या जगात मी कुतूहलाने डोकावून पाहिलं...कापसाच्या मऊशार दुलईवर गवताच्या काड्या गोलाकार अंथरलेल्या...त्याच्या बांधणीवरूनच त्यातली उब मला जाणवली...
सई,  वाऱ्याच्या मंद झुळूकीवरही हलकेच झुलणार  तुझं इवलुसं घरट बांधायला तू निवडलस अजूनही बालवयात असलेलं माझं चाफ्याचं झाड ....ज्याचा बुंधा अजून माझ्या दोन बोटांइतकाही रुंद नाही आणि ज्याच्या कायेला निबरपणाच अजून वारंही लागलेलं नाही इतकं नाजूक झाड...'किती विश्वासानं ही याच्या आह्र्याला आल्ये , पेलवेल नं याला ही जबाबदारी ?'...माझ्या मनात शंका ...'पण ज्या अर्थी तुझ्या पारखी नजरेनं याची निवड केलीय त्या अर्थी माझा चाफाही तयारीचा असावा'..असा मीच मला दिलासा दिला.
घरट बांधलंस त्या अर्थी तुझा विणीचा हंगाम जवळ आला असावा हे समजलं होतंच. अवघ्या २-४ दिवसातच काळे करडे बारीक ठिपके असलेली तीन अंडी त्या घरट्यात दिसली.  तुझ्या घरात नवे पाहुणे येणार याचा आम्हांला सर्वांनाच कोण आनंद झाला!
नेमकं त्याच वेळी पावसाच्याही अंगात आलं होतं...जणू माझ्या चाफ्याची परीक्षा घेण्यासाठीच तो वेडावाकडा कोसळत होता..सतत तीन दिवस...अविश्रांत! 'या वादळ वाऱ्यात  घरट  खाली पडून अंडी फुटली तर?'...तो विचारही सोसवत नव्हता मनाला पण तुझं  घरट वाचवण्यासाठी काहीही करू शकत नव्हते..कारण माणसानं घरटयाला स्पर्श केल्याचं पक्ष्यांना कळलं तर ते घरट सोडून जातात म्हणे...माझ्या हात लावण्याने तू घरटयात परतली नाहीस तर, तुझ्या मायेच्या उबेची प्रतीक्षा करणाऱ्या त्या जिवांचं काय होईल..या विचाराने मी चार हात दूरच राहिले..
पावसाच्या झोडपण्यानं चाफाही पार झुकला होता...इतका की कोणत्याही क्षणी उन्मळून पडेल असं वाटावं...पण त्याला सरळ करणं म्हणजे पाण्याला तुझ्या घरात प्रवेश करू देणं...शेवटी अगदी हलक्या हाताने, त्याच्या बुंध्याला दोरी बांधली, आधारासाठी...
दिवसा जास्त वेळ बाहेर असायचीस तू ... मात्र काळोखाच साम्राज्य पसरलं की तुझा मुक्काम घरटयातच असायचा...एका सकाळी, नेहमीपेक्षा जास्त जवळ जाऊन  तुझ घरट निरखायचा प्रयत्न केला तर, आतून तुझे दोन सुंदरसे इवले डोळे लुकलुकले....मला काही कळायच्या आत तू उडालीस सुद्धा..दूरच्या झाडावर बसून तुझ्या नाजूक आवाजात ओरडू लागलीस...माझं फार जवळ येणं रुचलं नसावं बहुदा म्हणून निषेध नोंदवत असावीस..
त्या दिवसांत तुझं घरट हाच एकमेव आमच्या गप्पांचा विषय होता..तुझी गोजिरी पिल्लं पाहण्याची उत्सुकता दिवसागणिक वाढत होती...आणि एक दिवस लक्षात आलं, ज्या दोन पानांनी तुझ्या घरटयाचा भार तोलला होता त्यातलं खालच्या बाजूला असलेलं पान सुकत चाललंय. नंतरच्या २-३ दिवसातच ते अगदी कोरडं होऊन गेलं. हे असं वठलेल पान उद्या तीन-तीन पिल्लांचा भार पेलेल का? ही शिवण उसवली तर?..या शंकेनं खूपच अस्वस्थ झालो आम्ही, पण काय करू शकत होतो?..ठराविक परिघाच्या पुढे तुझ्या जगात आम्हाला प्रवेशच नव्हता.
या घालमेलीत आणखी ५-६ दिवस गेले. आणि एका सकाळी सवयीनं नजर घरटयाची खुशाली जाणण्यासाठी चाफ्याकडे गेली...तुझं घरट जागेवर दिसेना..काळजात धस्स झालं माझ्या...हातातलं काम टाकून चाफ्याकडे धाव घेतली. तिथे त्याच्या पायाशी तुझं रिकामं घरट त्या वाळक्या पानासह पडलं होतं...'अंडी कुठायत यातली?' ती फुटलेली असू नयेत अशी मनोमन प्रार्थना करत नजर शोध घेऊ लागली ...सुदैवानं असं काही विपरीत दृष्टीस पडलं नाही.."अगं आई, तिनेच मोडलं असणार घरट...पण त्या आधी दुसरीकडे तयार केलं असणार नक्की..अंडी तिथे ठेऊन मगच हे घरट मोडलं असेल तिनं...' माझा लेक माझी समजूत काढत होता, पण त्यात तथ्यही असावं. कारण पानांची शिवण कोणीतरी हलक्या हाताने उसवल्यासाराखी दिसत होती.."आई, पक्ष्यानाही कळतो धोका,,,ते घरट कोणी पाडलं असतं तर एक अंड तरी फुटलेलं दिसलं असतं ना?"
"तो सांगतोय तसंच झालं असावं "...माझं मन प्रार्थना करत होतं ...आणि तुझ्यातल्या त्या गुणाच्या दर्शनाने चकीतही झालं होतं .. घरटयाला असलेला धोका तू  जाणलाही होतास आणि त्यावरचा उपायही तुला माहित होता...आमच्यापेक्षा अनंत उणीवा असलेल्या तू हे सारं बिनबोभाट पार पाडलं होतंस...तरी, आणखी किती युगं आम्ही स्वतःला श्रेष्ठ समजत राहणार आहोत, कुणास ठाऊक ?
तुझी अंडी सुरक्षित असतील यावर आता माझा विश्वास बसलाय. इथंच जवळपास असेल तुझं नवं घर, या आशेने माझी नजर चहूबाजूला भिरभिरत्ये...आज ना उद्या तुझी पिल्लं बाहेर येतील आणि त्याचं "ट्याहा " तुझी मोहीम फत्ते झाल्याची द्वाही फिरवेल..पण मला एक सांगशील, हे जग त्यांना दाखवण्यासाठी तू केलेली धडपड कधी पोचेल का त्यांच्यापर्यंत? कधी कळेल त्यांना , त्यांच्या आईचं मोठेपण? की, आई म्हणून ते तुझं कर्तव्यच होतं असं म्हणतील ती ?...नाही...तसं नाही होणार.तुझी बाळं तुझ्यासारखीच शहाणी, समजूतदार होतील याची खात्री आहे मला ...
आणि तुला एक सांगू सई, माझं ते लाडकं चाफ्याचं झाडही मला शहाणं झाल्यासारखं वाटतंय मला अलीकडे...ते मोठं व्हायला लागल्याच्या खुणा त्याच्या अंगोपांगी उमटू लागल्यायात...साहचर्य इतकं शिकवतं का गं?
आजही केव्हातरी तू आमच्या बागेत दिसतेस...आता तुझा   आवाज माझ्या ओळखीचा झालाय...दूर राहूनही तुझ्याबद्दल मनात असलेली आपुलकी, भाषेच्या अडसराशिवाय पोचेल का तुझ्यापर्यंत? सर्व प्राणिमात्रांचा आत्मा एकच असेल तर हा सदभाव पोचायलाच हवा तुझ्यापर्यंत...हो ना?
तुझ्यासारखी 'आई' व्हायला धडपडणारी,
तुझी सई