Friday, 10 February 2012

शहाणीवकिती भ्रमात असतो ना आपण मोठी माणसं...आपण शिकवल्याशिवाय मुलांना काही येणारच नाही अशी आपली ठाम समजूत असते...अगदी आजूबाजूच्या लोकांशी वागावं कसं, हे देखील आपण पदोपदी सांगायलाच हवं अशी आपली खात्री असते. हा भ्रम दूर करणारा किस्सा 2 वर्षांपूर्वी घडला आणि आम्ही मोठे थोडे शहाणे झालो.
त्याचं झालं असं...सातवीतून आठवीत जाणाऱ्या मुलांसाठी आमचं विद्याव्रत संस्काराचं शिबिर सुरू होतं. आधी हे शिबिर म्हणजे काय ते थोडक्यात सांगते. तर, मुंज या संस्काराला ज्ञान प्रबोधिनीने दिलेलं आधुनिक रुप म्हणजे विद्याव्रत संस्कार...त्यातली अनावश्यक कर्मकांडं, आशयापासून दूर गेलेला दिमाखदार सोहोळा हे टाळून हा संस्कार अधिकाधिक अर्थपूर्ण आणि सर्वसमावेशक कसा होईल याचा विचार विद्यव्रतात केला गेला आहे. म्हणूनच हा संस्कार वयाच्या 8 व्या वर्षी न करता, मुलाच्या वाढीच्या म्हणजे त्याच्या 'कळत्या' वयात (साधारण 8 वीच्या उंबरठयावर) आणि सर्व जातीधर्मातल्या मुलामुलींवर करण्यात येतो. प्रत्यक्ष संस्काराआधी हे सगळं का व कशासाठी करायचं हे शिबिराच्या माध्यमातून समजावून सांगितलं जातं. वाढीच्या वयात फक्त शरीराची वाढ होत नाही तर बुध्दिचाही विकास होत असतो, मन प्रगल्भ होत असतं, आजूबाजूच्या जगाविषयी ते मूल अधिक जाणतेपणी विचार करायला लागलेलं असतं..हे सगळं लक्षात घेऊन, शरीर-बुध्दी-मनाचा विकास होतो म्हणजे नेमकं काय होतं आणि तो प्रत्येकाला ठरवून, निश्चयपूर्वक कसा करता येतो याविषयी मुलांना समजेल, आवडेल अशा भाषेत पोचवण्यासाठी 6 दिवसांचं शिबिर घेतलं जातं. वेगवेगळी व्याख्यानं, खेळ, फिल्मस्, मुलाखती अशा विविध फॉर्मचा वापर करत विषय पोचवायचा प्रयत्न करतो. त्यानंतर प्रत्यक्ष संस्कार होतो. असं हे शिबिर..मुलांवर संस्कार करण्यासाठी होतं खरं, पण आम्ही शिबिर घेणारेही खूप शिकत असतो.
...तर अशाच एका शिबिरातला तो प्रसंग. दररोज एका विषयाशी संबंधित सत्रं होत होती. 'सामाजिक विकसन' या विषयावरची सत्रं ठरवताना आम्ही बराच विचार केला होता. खरं तर, मुलांचं वय पाहता हा विषय त्यांच्या आवाक्यापलिकडचा आहे असं आमचं मत होतं. अगदी छोटयाशा घरात, बहुतेक तीनच माणसांच्या घरात लहानाची मोठी होणारी ही शहरातली मुलं...त्यांना, 'आपलं घर म्हणजे एका मोठया समाजाचा एक छोटासा भाग आहे...आपण या समाजाचे एक घटक आहोत..खूप प्रकारची माणसं आपल्या अवतीभवती जगताहेत' याचं एक दर्शन घडवावं, तेही कोणताही उपदेश न करता असं ठरवलं. आजूबाजूच्या समाजाविषयी त्यांच्या मनात किमान आस्था निर्माण करणं एवढाच मर्यादित उद्देश मनात ठेवून आम्ही त्या दिवसाची आखणी केली.
 रेल्वे स्टेशनवर बेवारस फिरणाऱ्या मुलांसाठी काम करणाऱ्या 'समतोल फाऊंडेशन'च्या विजय जाधवांशी गप्पा मारुन 'सामाजिक विकसना'साठी असलेल्या दिवसाची सुरुवात झाली. पूर्णपणे अनोळखी असणारं त्या मुलांचं जगणं समजून घेताना मुलं इतकी तल्लीन होऊन गेली की सत्राची वेळ संपली तरी जाधवकाकांना सोडायला कोणी तयार होईना...'मावशी, मी सांगीन आता घरी जाऊन माझ्या आईला की माझे लहान होणारे कपडे या मुलांना देत जाऊ म्हणून...'एक जण म्हणाली, तर 'त्या मुलांचं शिबिर बघायला, त्यांच्याशी गप्पा मारायला मी जाऊ शकतो का आईबाबांना घेऊन?' असं एकाने विचारलं. जेवतानाही एकमेकांच्यात त्याच विषयावर गप्पा चालल्या होत्या. आम्हांला बरं वाटलं. विषय पोचतोय मुलांपर्यंत याची झलक मिळाली.
..मात्र खरं टेन्शन दुपारच्या संस्था भेटीचं होतं. कारण दुपारी आम्ही मतिमंद मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या आणि व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला भेट देणार होतो. 'त्यांच्या रुपाला आपली मुलं घाबरणार तर नाहीत किंवा हसणार तर नाहीत?' आमच्या मनात एकच प्रश्न...संस्थेत जाण्यापूर्वी आपण कुठे जातोय याची थोडी कल्पना द्यावी असं वाटलं. म्हणून सांगितलं, 'आत्ता आपण ज्या शाळेत जातोय, त्या शाळेतली मुलं दिसायला तुमच्याहून खूप मोठी दिसतील...काही जण तुमच्या दादाच्या वयाचे तर काही अगदी तुमच्या बाबांच्या वयाचे असतील. पण ती त्या शाळेतली मुलं आहेत. त्यांच्या मेंदूत काही बिघाड झाल्याने ती तुमच्या इतकं भरभर शिकू शकत नाहीत...तुमच्या इतकं त्यांना समजतही नाही...दिसतातही आपल्यापेक्षा थोडी वेगळी...पण ते आपलेच मित्र आहेत हे लक्षात ठेवा...मित्र म्हणून त्यांना शेकहँड करा...'फिरायला जायच्या मूडमधे असलेल्या आमच्या मुलांनी एका सुरात या गोष्टीला होकार दिला. आणि मनात थोडी धाकधूक घेऊनच आम्ही त्या संस्थेत पोचलो. इतकी मुलं आपल्याला भेटायला आलेली पाहून ते 'निरागस' चेहरे खुलून गेले. पुढे येऊन शेकहँड करायला लागले. आमच्या मुलांनीही, जणू काही खूप जुने मित्र एकमेकांना भेटताहेत असं वाटावं असा मनमोकळा प्रतिसाद दिला. ती सर्व इतकी एकमेकांमधे इतकी चटकन मिसळली की आम्ही पाहतच राहिलो. आमच्या मुलांचे हात धरुन ती मुलं शाळा दाखवायला घेऊन गेली आणि या सर्वांनीच अपार उत्सुकतेने त्यांची शाळा पाहिली. त्यांच्याकडून वर्तमानपत्राच्या कागदाची पिशवी करायला शिकली. आणि तेही कसं..तर त्यांना 'चिअर अप' करत...'ए...काय मस्त बनवल्येस रे ही पिशवी...मला पण शिकव ना...मला ना येतच नाही अशी घडी घालता...'एक जण म्हणाला...त्याच्या बोलणं ऐकून तर थक्कच झालो आम्ही...त्याच्याच सुरात सूर मिसळत मग बाकीचेही म्हणाले,'आम्हांलाही शिकवा ना अशा मस्त पिशव्या...'किती हुरुप आला त्या मुलांना...त्यांचा शिकवण्याचा उत्साह नुसता ओसंडत होता चेहऱ्यावरुन!...ते दृश्य पाहून आम्ही मोठी माणसं निर्धास्त मनाने संस्थेचा परिसर पहायला गेलो. अर्ध्या तासाने येऊन पाहतो तर काय...संस्थेच्या मैदानात क्रिकेटचा सामना रंगात आला होता..
आमची मुलं फिल्डिंग करायला उभी होती आणि त्यांच्या या नव्या दोस्तांना 'बॅटिंग'चा आनंद देत होती. त्यांना आऊट करत नव्हती की उगीचच आपलं बोलिंग स्कील दाखवत नव्हती...त्यांना फटके मारण्यातला आनंद कसा मिळेल एवढंच पहात होती..प्रत्येक बॉलला त्यांना 'चिअर अप' करत होती. त्यांच्यातल्या सामूहिक शहाणपणाच्या दर्शनाने आम्ही मोठी माणसं अक्षरश: आतून हलून गेलो. 'अगं, किती शहाणी बाळं आहेत गं आपली...आणि आपण काय समजत होतो त्यांना..अगं हसणं तर लांबच, पण अशांना आपलं म्हणून कसं जवळ करावं ते मोठयांनी यांच्याकडून शिकावं'...असं बोलतानाही एका मावशीच्या डोळयांत पाणी तरारलं...ते पाणी आनंदाचं तर होतंच पण त्यांच्यातल्या शहाणपणाला केलेला सलामही त्या डोळयांत दिसत होता...त्या दुपारनंतर आमचं शिबिर एका वेगळयाच उंचीवर जाऊन पोचलं...आम्ही देणारे आणि ते घेणारे असे राहिलोच नाही...दोघंही घेणारेच झालो...आपल्यालाही किती घ्यायचंय या मुलांकडून याची जाणीव या भेटीने करुन दिली...खऱ्या अर्थाने आम्हांला शहाणं करुन गेली.
-अश्विनी

2 comments:

  1. ashwini......... faar chhan..

    ReplyDelete
  2. te shibirch khup chhan hote, kharach tyatun apan khup kahi shiklo. tya athvani tazya kelyas.....

    ReplyDelete