Friday, 11 May 2012

क्षण निरोपाचा...


घरटयाच्या कठडयाशी येऊन भवतालच्या परिसराकडे अपार उत्सुकतेने पाहणाऱ्या त्याच्या इवल्याशा पण चमकदार डोळयांनी माझं लक्ष वेधून घेतलं. 'अगं बाई, किती लगेच मोठी झाली ही आणि धीटही...आणखी काहीच दिवस आपल्यासोबत.. इवल्याशा पंखांमधे पुरेसं बळ आलं, उडण्याचं शिक्षण मिळालं की आकाशात झेप घेतील... ' मोठी झाल्याचा आनंद आणि विरहाच्या क्षणाची लागलेली चाहूल दोन्ही एकाच वेळी मनात आलं आणि मन कातर झालं...'कसं दिसेल हे सुनंसुनं घरटं...? गेले महिनाभर  त्या इवल्याशा घरात मूर्तिमंत चैतन्य नांदत होतं...या अनपेक्षित आणि गोजिरवाण्या पाहुण्यांनी आमच्या आयुष्यातही अनोख्या आनंदाचे चार क्षण आणले होते. हे सगळं संपणार तर...? 

'आपल्या बागेतलं घरटं सोडून जाणार म्हणजे त्यांच्या जन्मदात्यांपासूनही दूर जाणार की? ' या अटळ सत्याची जाणीव झाली आणि मन अधिकच उदास झालं...त्या दोघांच्या संगोपनाच्या कालखंडाची मी एक साक्षीदार होते. अंडी उबवण्यापासून त्यांनी या दोन जिवांची घेतलेली काळजी मी पाहिली होती. दोघांनी आलटून पालटून दिलेली मायेची ऊब, घरटयाच्या परिसराची केलेली राखण, कावळयासारख्या शत्रूपासून आपल्या पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी ठेवलेला कडेकोट पहारा..दिसायला चिमणीचं मोठं भावंडं वाटावं असा हा नर्तक पक्षी, पण कावळयाशी ते  ज्या त्वेषाने भांडत असत ते पाहताना  त्यांच्या इवल्याशा कुडीचाही पाहणाऱ्याला विसर पडत असे. आपल्या पिल्लांवरची अपार माया त्या जिवांना कावळयासारख्या, त्यांच्यासमोर बलाढय दिसणाऱ्या शत्रुशी दोन हात करण्याचं बळ देत होती. अंडयावरचे तपकिरी रंगाचे ठिपके वाढू लागले आणि गडदही होऊ लागले तेव्हा माझ्या लेकाने मला सांगितलं, 'आई, आता लवकरच पिल्लं बाहेर येतील.' यापूर्वी कधी हा अनुभव घेतला नसल्याने मनात अपार उत्सुकता आणि हुरहूर दाटली होती. आणि अगदी दोन दिवसांतच पिल्लांनी दर्शन दिलं..पालीचं पिल्लू वाटावं इतक्या नाजूक शरीराचे तो दोन कोवळे जीव पाहिले आणि औत्सुक्य-आनंदाची जागा काळजीने घेतली. अक्षरश: बोटभर आकार आणि अतिकोमल काया... 'कस{ वाढवतील या जिवांना आणि सतत घिरटया घालणाऱ्या त्या कावळयाचं काय? त्याला लागली असेल का यांच्या जन्माची खबर? इतकं कोवळं मांस म्हणजे त्याला मेजवानी..'माझ्या मनात नुसतं काहूर माजलं..आधी नुसती अंडयांना ऊब द्यायची होती. आता उब देण्याबरोबरच खाऊपिऊ घालायचं होतं, बाहेरच्या जगात वावरण्याला लायक करायचं होतं..पंख्यासारखे पंख पसरत आकाशात डौलाने उडायलाही शिकवायचं होतं. 'इतकं सगळं जमेल त्यांना?' पक्षीजगताच्या तोकडया अनुभवामुळे मी अधिकच चिंतातुर बनले होते. काही दिवसांतच माझ्या शंका आणि चिंता दूर पळाल्या. कावळयाशी ते पूर्वीपेक्षाही त्वेषाने भांडत होते. या भांडणात एक दिवस त्यातल्या वडिलांचा पंख कापला गेला, तरी त्यांनी कर्तव्यात कसूर केली नाही. आपल्या इवल्याशा चोचीत बारीक किडे आणणं आणि ते या पिलांच्या मुखात घालणं हे काम सतत चालू असे. पिलं जन्माला आली की लगेच दृष्टी येत नाही. डोळे उघडायला काही दिवस जातात. पण त्या आधीही आपले आईवडील  आपल्यासाठी खाऊ घेऊन आले आहेत हे त्यांना नेमकं समजायचं, ते घरटयापाशी आले की आपोआप त्या दिशेने तोंड करुन ते आपला इवलासा 'आ' वासायचे. हे  सारं प्रत्यक्ष बघण्यातही मौज होती. आनंद होता. त्यांना दिसामाशी वाढताना पाहणं सुखावणारं होतं. हळूहळू गुलाबी त्वचा करडया-तपकिरी केसांनी झाकली गेली. डोळे उघडले, नजर आली. इवल्याशा पण टाकदार चोचीचा आकार दिसायला लागला. पिलं मोठी होताना त्यांना सामावून घेण्यासाठी ते घरटंही रुंदावत गेलं. काळजी वाटावी अशा अतिकोमल कायेपासून एका गोंडस-गोजिरवाण्या पिल्लांपर्यंतचा त्यांच्या वाढीचा प्रवास पाहताना खूप समाधान मिळालं. यासाठी त्यांच्या जन्मदात्यांनी घेतलेली जिवापाड मेहनत आणि डोळयांत तेल घालून घेतलेल्या काळजीला खूप चांगलं फळ आलं होतं. आता ती पिल्लं धीटपणे घरटयाबाहेर डोकावताहेत, त्याच्या कडेवर उभं राहण्याचं धाडस करताहेत. हळूहळू उडण्याचं प्रशिक्षण चालू होईल.
ज्या एकझोऱ्याच्या झाडावर हे इवलंसं घरटं बांधलं आहे, त्यालाही बहर येतो आहे. गुलाबी रंगाच्या नाजूक फुलांचे घोस त्याच्या अंगोपांगी लगडू लागले आहेत. हा त्याचा दरवर्षीचा बहराचा मोसम असला तरी ही नर्तक पक्षाला निरोप देण्यासाठी केलेली तयारी आहे असे वाटते आहे. या साहचर्याने त्या झाडालाही काही दिलं असेलच ना? त्याची कृतज्ञ फेड करण्यासाठी तर ही फुलांची आरास निरोपासाठी मांडली नसेल?
आणि त्या पिल्लांचे जन्मदाते...? बाकीच्यांना जाणवलेला निरोपाचा क्षण त्यांच्याही लक्षात आला असेलच की... त्यांचं दिसामाशी वाढणं म्हणजे आपल्यापासून दूर जाण्याच्या दिशेने एक पाऊल टाकणं हे त्यांना पहिल्या दिवसापासून कळलं असावं...स्वत:च्या जिवापल्याड पिल्लांचं रक्षण केलं, मायेची ऊब दिली पण म्हणून विरह टळू  शकतो थोडाच...? हे स्वीकारायची त्यांची तयारी असावी असं त्यांच्याकडे पाहून वाटतंय. किती समंजस दिसताहेत दोघंही..आणि कृतकृत्यही...एक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याचं समाधान असेल त्यांच्या मनात... मायेच्या पाशात पिल्लांना गुंतून न ठेवता त्यांना मुक्त आकाशात उडू देण्यासाठी त्यांनी मन घट्ट केलं असावं, असंही मला वाटतं आहे. इथून उडाल्यावर कदाचित पुन्हा गाठ पडणारही नाही.  आकाशात विहार करताना जर समोर आले तर ओळख पटत असेल आपल्या जन्मदात्यांची? कुणास ठाऊक! पण या चिंतेची सावली आज त्यांच्या चेहऱ्यावर नाही. सहवासाचे जे चार क्षण नियतीने नशिबी लिहिले आहेत त्यातलं सुख लुटावं, आनंद घ्यावा आणि निरोपाची वेळ झाली की 'शुभास्ते पंथान:' म्हणून हसतखेळत निरोप द्यावा असं सांगणारे भाव त्या जन्मदात्यांच्या चेहऱ्यावर वाचता येताहेत...आणि मी किती खुळी! जमेल ना यांना पालकपण असा विचार करत होते!..उलट  गेल्या महिन्याभरात त्यांनीच खूप शिकवलं आहे...माणसांपलिकडच्या जगात पालकपण कसं निभावलं जातं याचं दर्शन मला घडवलं आहे. त्यांना हसतमुखाने निरोप द्यायचा इतकंच आत्ता ठरवलं आहे. खरं तर मी आणि माझी बाग आता पुढच्या सृजनसोहोळयाकडे डोळे लावून बसलो आहोत...आम्हांला भरभरुन देणाऱ्या अशा आणखी एका सोहोळयाकडे!
-अश्विनी