Thursday, 20 December 2012

पोरी, जरा जपून...
पोरी, जरा जपून
दोन पायांची श्वापदं फिरतायत अवतीभवती
आणि त्यांच्यासाठी पिंजरे बनवणं, त्यांना बांधून घालणं
हे येरागबाळयाचं काम नाही...
खरं तर कोणालाच जमणार नाही गं ते!
बाईला फक्त मादी समजणारी ही श्वापदं कधी जन्माला आली?
...कशी आपल्यातच वाढत गेली...?
हे कळलंच नाही, परग्रहावर जायची स्वप्नं पाहणाऱ्या इथल्या माणसाला...
...तेव्हा तूच करायचं आहेस स्वत:चं रक्षण...जमलं तर...
नाहीतर, भोग वाटयाला आलेले भोग...!
स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्या दूरदृष्टीच्या 'शहाण्या' दांपत्यांना
सरकार पुरस्कार जाहीर करणार आहे म्हणे लवकरच....
एका निष्पाप जिवाचा या नरकातला प्रवेश रोखला म्हणून...
मी तर तेवढीही शहाणी नव्हते बघ...
तुला जन्म देऊन मोकळी झाले....
माणूस म्हणून वाढवायच्या खुळया नादात
माणसं संपत चालली आहेत इकडे लक्षच गेलं नाही माझं...
आता माझ्या या चुकीचं प्रायश्चित्त तू घ्यायचंस...
आजच्या दुनियेचा हाच तर रिवाज आहे...!
                                                                      -अश्विनी